राष्ट्रीय राजकारणात नव्या उमेदीने सक्रिय होण्यासाठी नितीन गडकरी यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या दूरध्वनीमुळे ऐन वाढदिवशी नवी उभारी मिळाली आहे. गडकरींवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणनीती आखण्याची मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता त्यांच्या निकटस्थांनी वर्तविली. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बडय़ा पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न चालविला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने वाढदिवशी कोणताही जाहीर कार्यक्रम घेऊ नये, असे स्पष्ट आदेशच गडकरींनी दिले होते, परंतु कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालणे कठीण झाल्याने फक्त हारतुरे आणि शुभेच्छांचा गडकरींनी वाडय़ावर स्वीकार केला. काही कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गडकरींचे अभिनंदन केले. नेमका हा सोहळा सुरू असतानाच वाढदिवसाच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांचाही शुभेच्छा देणारा दूरध्वनी आला, अशी माहिती निकटस्थ सूत्रांनी दिली. वाढदिवस हे निमित्त असले तरी गेल्या काही महिन्यांपासून गडकरींना राष्ट्रीय पातळीवरील एखादी मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू असून यात अडवाणी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘ट्रम्प कार्ड’ असलेल्या गडकरींवर चालू वर्षांअखेर होऊ घातलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून सोपविली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नितीन गडकरी यांना पक्षाध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द मिळावी, यासाठी पक्षात घटनेत बदल करण्यात आला होता, परंतु गडकरींवर पूर्ती समूहातील गैरव्यवहाराच्या निमित्ताने झालेले आरोप आणि पाठोपाठ त्यांच्या कंपन्यांवर टाकण्यात आलेल्या धाडींमुळे अडचणीत आलेल्या गडकरींना दुसरी संधी मिळू शकली नव्हती. तेव्हापासून गडकरींवर पक्षाच्या नवी दिल्लीतील बैठका वगळता फारशी कोणतीच मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. त्यांच्यासाठी आता अडवाणींनी जोर लावला असल्याने अडवाणींच्या शब्दाखातर गडकरी पुन्हा एकवार राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर उतरतील, असे चित्र आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली यांचा छुपा विरोध असलेल्या गडकरींना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळू शकले नाही. मात्र, महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची धुरा गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच राहणार हे आता स्पष्ट झाले असल्याने गडकरींना राष्ट्रीय पातळीवर सामावून घेतले जाण्याच्या शक्यतेला आणखी बळकटी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितीन गडकरी आणि अडवाणी यांच्यात या महिन्यात तीन वेळा चर्चा झाली. गेल्या गुरुवारी रात्री गडकरी नवी दिल्लीतून नागपूरला रवाना होण्यापूर्वी दोघांची भेट झाली होती. त्यामुळे गडकरी नागपूरला परतल्यानंतर सोमवारी आलेला अडवाणींचा दूरध्वनी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही गडकरींची दिल्लीतील मुक्कामी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद राजनाथ सिंह यांच्याकडे गेल्यानंतर गडकरींनी आता खऱ्या अर्थाने विदर्भावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नागपूर मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न सुरू केले आहेत. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने विकासकामांचा दाखला देऊन लोकांना आकर्षिण्यासाठी स्थानिक भाजप नेते आतापासूनच कामाला भिडले आहेत. यवतमाळात येत्या २ जूनला होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतही गडकरींनी भाजप उमेदवार मदन येरावार यांच्या प्रचारासाठी जबरदस्त ताकद लावली आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही यवतमाळची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
अडवाणींच्या दूरध्वनीमुळे गडकरींना उभारी
राष्ट्रीय राजकारणात नव्या उमेदीने सक्रिय होण्यासाठी नितीन गडकरी यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या दूरध्वनीमुळे ऐन वाढदिवशी नवी उभारी मिळाली आहे. गडकरींवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणनीती आखण्याची मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता त्यांच्या निकटस्थांनी वर्तविली. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बडय़ा पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न चालविला आहे.
First published on: 30-05-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari ready to activate in national politics after advani call