आयाराम-गयाराम हा मुद्दा गेल्या कित्येक दशकांपासून महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात चर्चिला गेला आहे. यापासूनच राजकारणाची सुटका व्हावी, म्हणून पक्षांतरबंदी कायदा जन्माला आला. मात्र, त्यानंतरही पक्षफुटीचे प्रकार संपलेले नाहीत. गेल्या अडीच वर्षांत आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतरही विरोधी पक्षांमधून भाजपा किंवा शिंदे गटात जाणाऱ्या नेतेमंडळींची नावं त्या त्या वेळी चर्चेत येतात. नुकताच माजी मुख्यमंत्री व एकेकाळचे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यासंदर्भात भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
नितीन गडकरींनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विरोधी पक्षांमधून भाजपामध्ये येणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. यासंदर्भात त्यांनी इतर पक्षातील नेते जसे असतील त्यांना तसं पक्षात घ्यायचं आणि नंतर दुरुस्त करायचं, असं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरींना अजित पवारांनी शरद पवारांना सोडून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याचं समर्थन केलं. “अजित पवार आमच्यात आले. त्यांनी आम्हाला स्वीकारलं आहे. आपल्या विचारांनी जाण्यात महाराष्ट्राचं हित नाही हा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी त्यांचं मन बदललं. ते खुल्या दिलानं आमच्याकडे आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं”, असं ते म्हणाले.
नितीन गडकरींचे नरेंद्र मोदींशी खरंच मतभेद आहेत? स्वत:च दिलं उत्तर; म्हणाले, “माझा एक स्वभाव आहे…”
“काँग्रेस-शिवसेनेची आघाडी मला पटली नाही”
“बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेचा विचार आणि काँग्रेसचा विचार यांच्यात मेळ नाहीये. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसची युती मला योग्य वाटत नाही. कारण आघाडी समविचारी पक्षांची होते. भाजपा व शिवसेनेची युती त्यामुळेच झाली होती. युती विचारांच्या आधारावर होते. नीतीच्या आधारावर होते. त्यामुळे राहुल गांधी-उद्धव ठाकरे जवळ बसल्याचं मला विशेष वाटलं”, अशा शब्दांत नितीन गडकरींनी राहुल गांधींच्या मुंबईत झालेल्या सभेसंदर्भात टिप्पणी केली.
“आम्हाला पक्षाचा विस्तार करायचा आहे”
दरम्यान, इतर पक्षातून आरोप असणारे किंवा गैरव्यवहारात अडकलेल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जात असल्याबाबत नितीन गडकरींना विचारणा करण्यात आली. यावेळी मोदींनी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्यानंतर काही दिवसांत अजित पवारांशी युती केल्याबाबतही विचारणा करण्यात आली. त्यावर नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं.
उद्धव ठाकरेंच्या ‘ऑफर’वर नितीन गडकरींची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “कदाचित त्यांच्या मनात…”
“आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. जे लोक आमच्या विचारांना स्वीकारून आमच्याकडे यायला तयार असतील त्यांना पक्षात घेऊन आम्हाला ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजेत या ध्येयासाठी काम करायचं आहे. समाजातूनच आम्हाला माणसं घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे इतर पक्षातील नेते जसे असतील तसं त्यांना घ्यायचं आणि इथे आल्यावर दुरुस्त करायचं”, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत येतील का?
दरम्यान, यावेळी नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. “राजकारण व क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जिंदगी एक रेल्वे थर्ड क्लास का डब्बा है. हा खाली बसला तर तो उभा राहील, तो खाली बसला तर हा उभा राहील. हे चालतच राहणार आहे. एखादा नेता आमच्याकडे आला, तर जे पदरी पडलं ते पवित्र झालं. आमच्याकडे जो आला तो नक्कीच आमच्यासारखा वागेल. त्यामुळे सगळं चांगलं आहे”, असं विधान नितीन गडकरींनी यावेळी केलं.