मंदार लोहोकरे, लोकसत्ता

पंढरपूर : वाखरी ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हा ८.४ किलोमीटर रस्तादेखील आता महामार्गाच्या धर्तीवर बनवला जाणार आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी १५० कोटी रुपयांच्या या कामास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत हा लोकवस्तीतून जाणारा रस्ता चौपदरी, दुपदरी, उड्डाण पूल, भुयारी मार्ग अशा विविध सोयीने हा रस्ता बनवला जाणार असल्याची माहिती माजी आ. प्रशांत परिचारक यांनी दिली.

तीर्थक्षेत्र पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्गाला विविध ठिकाणाहून जोडले आहे. कोल्हापूर-पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर, पंढरपूर सोलापूर, पंढरपूर फलटण मार्ग पुणे हा संत माउलींचा पालखी मार्गाचे काम सुरू आहे. तर यातील काही रस्ते पूर्ण झाले आहेत. मात्र सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथे एकत्र येऊन पुढे पंढरपूरला जातात त्या ठिकाणचा काही रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. या साठी या पूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे या बाबत प्रस्ताव दिला होता. मात्र शहरांतर्गत रस्ते करता येणार नाही म्हणून हा प्रस्ताव रद्द झाला. मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंढरपूर येथे आले होते. त्या वेळेस या बाबतचा प्रस्ताव सादर केला आणि यानंतर त्यांनी याचा आढावा घेतल्यावर वाखरी ते मंदिर अशा ८.४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाला मंजुरी दिली आहे. यासाठी १५० कोटी रुपयांचा निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

या ८.४ किलोमीटर लांबीच्या टप्प्यात काही भागात हा रस्ता चौपदरी होणार आहे. तर ‘एमआयटी’ महाविद्यालय ते अर्बन बँक या ७ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये छोटे दोन पूल, भुयारी मार्ग, उड्डाण पूल असा चौपदरी होणार आहे. तेथून पुढे म्हणजेच अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता दुपदरी होणार आहे. सध्या जेवढा रस्ता आहे. तसाच पण सिमेंटचा रस्ता होणार आहे. या कामी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती माजी आ. प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.

पंढरीत वर्षांतील विविध वाऱ्यांच्या वेळी लाखो भाविक येत असतात. रोजची भाविकांची संख्याही काही हजारांमध्ये असते. अशा वेळी या गर्दीचे व्यवस्थापन करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे सोपे जावे या कामी या रस्ते सुधारणांचा उपयोग होणार असल्याचा दावा परिचारक यांनी केला आहे.

वाखरी ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हा ८.४ किलोमीटर रस्ता महामार्ग होणार आहे. चौपदरी, दुपदरी, उड्डाण पूल, भुयारी मार्ग अशा विविध सोयीने या रस्त्याचे महामार्गात रुपांतर केले जाणार आहे.  केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी १५० कोटी रुपयांच्या या कामास मंजुरी दिली आहे.

Story img Loader