अमरावती : करोनाची भयावह लाट थोपवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती जिल्ह्य़ासाठी भरघोस मदत केली आहे. एकूण ३० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले असून येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पाच कोटी रुपये खर्चून २०० क्युबिकच्या प्राणवायू संयंत्राची उभारणी के ली जाणार आहे. कोविडची लाट थोपवण्यासाठी नितीन गडकरी यांनी प्राणवायू पुरवठा, रेमडेसिविर, व्हेंटिलेर्टर्स, रुग्णवाहिका आणि आवश्यक त्या सामग्रीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावतीला देखील ठोस मदत द्यावी, अशी विनंती माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी नितीन गडकरी यांना केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी मदतीच्या पहिल्या टप्प्यात अमरावतीला भरीव मदतीचा हात दिला. शनिवारी नागपूर येथे डॉ. सुनील देशमुख यांच्यासह श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, महापौर चेतन गावंडे, मनपा सभागृह नेता तुषार भारतीय, सरचिटणीस प्रशांत शेगोकार यांच्याकडे अमरावती शहरासाठी ३० व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले.  यातील दहा व्हेंटिलेटर्स डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला, दहा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व दहा अमरावती महापालिकेला देण्यात आले.

आगामी काळात प्राणवायूचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला २०० क्युबिकचे प्राणवायू संयंत्र  सामाजिक दायित्व निधीतून उभारण्याचे नितीन गडकरी यांनी कबूल केले आहे. आगामी आठवडय़ात या संयंत्राच्या उभारणीला प्रारंभ होणार या शिवाय अमरावती शहराला आणखी मदत करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. भरघोस मदत केल्याबद्दल सर्वानी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader