नाशकात प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खास २०-ट्वेण्टी स्टाईल फटकेबाजी, तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पाजलेला सहकार ज्ञानाचा डोस. राजकारणावर कोणतेही भाष्य न करण्याचे सांगणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमधून बरोबर राजकीय तीर मारले गेले हा केवळ योगायोग, आणि तो जुळून आला नाशिक र्मचट्स सहकारी बँकेचे अध्यक्ष हुकुमचंद बागमार यांच्या शुक्रवारी आयोजित केल्या गेलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने. बँकेला प्रगतीपथावर नेण्यास हुकुमचंद यांच्या शिस्तप्रिय कार्याचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगणाऱ्या राज यांनी बँक जर विनंतीचंद, अजितचंद वा छगनचंद अशा कोणाच्या हाती असती, तर नक्कीच बुडाली असती, असे सांगून राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. गडकरी यांनी सहकारात एकत्र काम केल्यास प्रगती साधली जाते, परंतु राजकारणात सहकाऱ्याचे पाय ओढण्याची स्पर्धा लागते, असे सांगत सहकार क्षेत्रातील आपला व्यासंग भाषणातून प्रगट केला.
सातपूर येथील र्मचट्स बँकेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास खा. प्रतापदादा सोनवणे व हरिश्चंद्र चव्हाण, मनसेचे वसंत गिते, नितीन भोसले व अ‍ॅड. उत्तम ढिकले हे तिघे आमदार, आ. मनीष जैन, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्यासह बँकेचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. राज यांचा हा दौरा अतिशय धावता होता. अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सहकार क्षेत्राची स्थिती अतिशय बिकट असून या परिस्थितीत र्मचट्स बँकेने केलेली नेत्रदीपक कामगिरी उल्लेखनीय असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. बँकेच्या संचालक मंडळावर सर्वपक्षीय नेते असूनही ती बागमार यांच्यामुळे प्रगतीपथावर राहिली. नाशिक महापालिकेत सत्ता येऊनही कामे होत नसल्याची ओरड प्रसारमाध्यमांमधून होत आहे. नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर काय काम केले ते आपण पुन्हा येऊन दाखवून देऊ, असे त्यांनी नमूद केले. पालिकेतील सत्तेला किती दिवस झाले हे देखील त्यांना ज्ञात नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून उघड झाले. यावेळी त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटा काढण्याची संधी दवडली नाही. त्यात त्यांचे लक्ष्य ठरले ते राष्ट्रवादीचे अजित पवार व छगन भुजबळ. र्मचट्स बँक अशा कोणाच्या हाती असती तर अडचणीत सापडली असती असेही त्यांनी खुमासदार शैलीत सांगून टाकले. भाजप हा तसा सहकारापासून काही अंतर राखणारा पक्ष. परंतु, यावेळी पक्षाच्या अध्यक्षांनी सहकारातून प्रगतीचे महत्त्व विषद केले. एवढेच नव्हे तर, ‘सहकार’ या विषयावर जणू त्यांनी एक अभ्यासवर्गच घेतला. सहकारात एकत्र काम केल्यास प्रगती साधली जाते, परंतु राजकारणात सहकाऱ्याचे पाय ओढण्याची स्पर्धा लागते. सहकार चळवळ वाढली. परंतु गुणवत्ता मात्र कमी झाली. त्यामुळेच सहकार क्षेत्रात काम करणे अवघड झाले. देश कठीण परिस्थितीतून जात आहे. दुष्काळ, शेतीचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, आर्थिक विकास दर आदींचा उल्लेख करून आर्थिक विकासात चीन-भारत स्पर्धेकडे जग पाहात होते. आपल्यासमोर संधी असूनही त्यांचा प्वापर करण्यात आपण कमी पडलो, अशी खंतही व्यक्त केली. भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे, अशा शब्दांत त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. बागमार यांच्या कार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा