Nitin Gadkari On Dynastic Politics : भाजपाकडून अनेकदा घराणेशाहीवरून काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांच्या मुलांना तिकीटं दिली आहेत. त्यानंतर आता काँग्रेसकडून भाजपाला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर परखड भाष्य केलं आहे.
नितीन गडकरी यांनी नुकताच ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान काही नेत्यांच्या मुलांना तिकीटे मिळवण्यासाठी भाजपाचा हा उत्तम पर्याय वाटतो. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत, पक्षात काही समस्या आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भात बोलताना, योग्यता नसताना नेते जेव्हा त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागतात, तेव्हा समस्या निर्माण होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
“मी कधीही घराणेशाहीचं राजकारण केलेलं नाही. माझ्या कुटुंबातील एकही सदस्य राजकारणात नाही. मी त्यांना सांगितले की माझ्या आई-वडिलांनी आणि मी जे काही कमावले ते त्यांचे आहे. पण माझ्या राजकीय वारशाचा हक्क हा माझ्या कार्यकर्त्यांना आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“नेत्याचा मुलगा राजकारण असणं गुन्हा नाही”
पुढे बोलताना, “कोणत्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारण असणं हा गुन्हा नाही. पण जोपर्यंत तो त्याची योग्यता सिद्ध करत नाही, तोपर्यंत नेत्यांनी त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागू नये. जर तो योग्य असेल आणि कार्यकर्त्यांचा त्याच्यावर विश्वास असेल, तर ते मुलासाठी तिकीट मागू शकतात. राजकारण गुणवत्ता असलेला व्यक्तीच पुढे जातो. पण केवळ राजकीय नेत्याचा मुलगा आहे, म्हणून त्याने राजकारण येऊ नये, असं म्हणणंही चुकीचं आहे. असं म्हणून आपण त्याचा हक्क हिरावून घेतो. ते योग्य नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?
विरोधक मजबूत असणं लोकशाहीसाठी आवश्यक
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी लोकशाहीतील विरोधी पक्षाचे महत्त्वही अधोरिखित केलं. भारतात जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये न्यायपालिका, मीडिया, विधिमंडळ आणि कार्यपालिका आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतो. गाडी किंवा ट्रेनच्या चाकांप्रमाणेच दोन्ही महत्त्वाच्या आणि समतोल असणे आवश्यक असते, असे ते म्हणाले. तसेच सक्षम विरोधीपक्ष लोकशाहीसाठी आवश्यक आहे का? असं विचारलं असता, लोकशाहीसाठी ते चांगले आहे. राजकारण हे सामाजिक-आर्थिक शक्तीचे साधन आहे. आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.