सांगली : शहराबरोबरच ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देश आत्मनिर्भर होउ शकत नाही. यासाठी ग्रामीण भागासाठी चांगले रस्ते, पाणी आणि वीज या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक  मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इस्लामपूर येथे बोलताना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्लामपूर येथे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेच्या नवीन विद्यार्थी वसतीगृह इमारतीचे आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक  व्यायामशाळेचे उद्घाटन केंद्रिय मंत्री गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश खाडे, अरूण लाड, रोहित पाटील, सुहास  बाबर, माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक,  संस्थेचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील आदींसह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, महात्मा गांधी  ९० टक्के लोक खेड्यात राहतात असे सांगत होते. मात्र, आज यापैकी  ३५ टक्के लोक शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. हे स्थलांतर आनंदाने झालेले नाही, तर सुविधांच्या अभावाने झाले आहे. यातून शहरी भागात झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. जीडीपीमध्ये २२ ते  २४  टक्के वाटा उद्योगाचा, ५२ ते ५४ टक्के सेवाक्षेत्राचा आहे, तर केवळ  १४ टक्के वाटा ग्रामीण व शेतीचा आहे. जर ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर चांगले रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हे झाले तरच भारत आत्मनिर्भर होउ शकतो.

राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच हवे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते, निवडून आला नाही तर तुम्ही पक्षाचे, आमदार, खासदार झाला तर जनतेचे आणि मंत्री झाला तर देशाचे हा विचार हवा. राजकारण हे विकासाचे हवे, केवळ  सत्तेचे राजकारण देशाचा विकास करू शकत नाही. राजकारणात होणारी टीका ही मनावर फारशी घ्यायची नसते. केवळ बातम्यामधून उपस्थित केल्या जाणार्‍या शंकांमुळे संवेदनशील राहू नये.

यावेळी बोलताना आ. पाटील यांनी मंत्री गडकरी यांचे देशभर झालेल्या रस्ते विकासाचे श्रेय देत कौतुक केले. पेठ- सांगली रस्त्याचे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा  ४६  टक्के कमी दराने निविदा मंजुरी होउनही चांगल्या दर्जाचे झाले आहे असे सांगत राज्यात मात्र  २५  ते  ४५ टक्के अधिक दराने रस्त्याची कामे होत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.

आता माध्यमांनी केद्रिय मंत्री गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या प्रसारित करू नयेत असा मिश्किल सल्ला देत असे चिंतन करणार्‍या माध्यमांच्या कृतीचे शल्य वाटते. चांगल्या उद्देशाने राजकीय व्यक्ती एकत्र येउ शकत नाहीत अशी धारणाच झाल्याची खंत आ. पाटील यांनी व्यक्त केली.