राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करून त्याऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा (ANPR) बसवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठीचा चाचणी प्रकल्प ( Pilot Project ) सुरू करण्यात आला असून यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा – “भाजपाची तळी उचलून…” राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून अंबादास दानवे यांचा हल्लाबोल!
काय म्हणाले नितीन गडकरी?
चारचाकी गाड्यांमध्ये कंपनीने फीट केलेल्या नंबरप्लेट बसवण्याचा निर्णय आम्ही २०१९ मध्ये केला होता. त्यानुसार गेल्या चार वर्षात आलेल्या चारचाकी गाड्यांना या नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत. आता टोलनाके काढून स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्यात येणार आहे. हे कॅमेरे गाडीच्या नंबरप्लेटवरील नंबर वाचून त्याला जोडण्यात आलेल्या बॅंक खात्यातून पैसे वजा होतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ”आम्ही या योजनेचा चाचणी प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, यात काही त्रुटी आहेत. जर वाहन चालकाने कॅमेरा चुकवण्याचा प्रयत्न केला किंवा बॅंक खात्यात पैसे नसेल, तर त्याबाबत काय शिक्षा असेल, यासंदर्भात आपल्याला कायद्यात सुधारणा कराव्या लागताली. तसेच ज्या गाड्यांना या विशिष्ट नंबर प्लेट नसतील त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी नियम करावे लागतील. यासाठी आपल्याला कायदा आणावा लागेल”
”सद्यस्थितीत ४० हजार कोटींच्या एकूण टोलवसूली पैकी ९७ टक्के रक्कम फास्ट टॅग ( FASTags) द्वारे होते आहे. उर्वरित 3 टक्के रक्कम सामान्य टोल दरांपेक्षा जास्त पैसे देणाऱ्याकडून येते. फास्ट टॅग लावल्यास टोल प्लाझा ओलांडण्यासाठी एका वाहनाला सुमारे ४७ सेकंद लागतात”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – टोलनाक्यांच्या आंदोलनावरुन टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, “हातात सत्ता द्या, उर्वरीत…”
कॅमेरे कसे काम करतात?
भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके हटवून त्या जागी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्याची सरकारची योजना आहे. हे कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट्स वाचतील आणि वाहन मालकाने नंबर प्लेटला जोडलेल्या बॅंक खात्यातून पैसे वजा करण्यात येतील. या योजनेमुळे टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, ही योजना कशाप्रकारे अंमलात आणल्या जाते, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.