गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा गावातील घडलेल्या घटनेची माहिती घेण्याकरिता अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थूल व रोजगार हमी योजना आणि जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज, सोमवारी दुपारी 2 वाजता कवलेवाडा गावाला भेट दिली.
कवलेवाडा येथील घडलेल्या घटनास्थळाला त्यांनी भेट दिली. जखमी संजय खोब्रागडे यांच्या घरी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. कवलेवाडा गावातील नागरिक एकमेकांशी अत्यंत सामंजस्य व एकोप्याने राहत असतांना अचानक मन सुन्न करणारी दुर्देवी घटना कशी घडली, या मागचे नेमके कारण काय असू शकते, याबाबत त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यासाठी पोलीस दलाची आवश्यक ती कारवाई सुरू असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.
सी.एल.थूल यांनीही यावेळी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन घटनेच्या सत्यतेची पडताळणी करण्यात येईल, असे सांगितले. गावामध्ये सामंजस्य व सलोखा कायम ठेवावा, असे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.
कवलेवाडा येथे भेट देण्यापूर्वी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात असलेल्या संजय खोब्रागडे यांची भेट घेऊन सी.एल.थूल व डॉ.नितीन राऊत यांनी आस्थेने विचारपूस केली. कवलेवाडा येथील घटनास्थळी भेट दिल्यावर ज्या जागेवरून वाद घडला ती समाजभवनाची जागाही बघितली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप झळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश िशदे, उपविभागीय अधिकारी दिलीप सावरकर, पी.जी.कटरे, रत्नदीप दहिवले यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.

Story img Loader