विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल येत आहेत. त्यांच्यासोबत एकूण १३ आमदार असून ते सध्या गुजरात राज्यातील सुरतमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हेदेखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच नॉट रिचेबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचेच आमदार नॉट रिचेबल असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रवादीविरोधातील नाराजीकडे दुर्लक्ष करणं भोवलं?; एकनाथ शिंदेंसोबत रायगडचे तिन्ही शिवसेना आमदार संपर्क क्षेत्राबाहेर
“नेहमीच नॉट रिचेबल असणार्या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार आता नॉट रिचेबल येत आहेत. गुरूची विद्या गुरूला ?” असे ट्विट नितीन सरदेसाई यांनी केले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सध्या एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असून त्यांच्यासोबत १३ आमदार आहेत. दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते कोणती भूमिका घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर शिवसेनेनेदेखील आपले काही आमदार संपर्कात नसल्याचे मान्य केले आहे.
हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : मतं फुटल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात म्हणाले, “होय…”
“शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद ही कधी शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत आहात. ज्यांची नावे माध्यमातून पाहत आहे त्यातले बरेचशे आमदार वर्षा बंगल्यावर आहेत. काही मंत्र्यांशी संपर्क झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे आणण्यात आल्याचे सांगितले आहे. ते आमदार गुजरात आणि सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपाचे अध्यक्ष करत आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.