अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी त्यांच्या किर्तनातून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केलीय. मात्र ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलं आहे.
अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. इंदुरीकर महाराजांनी या किर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला. “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
इतकच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही वक्तव्य केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. या किर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकलं. व्हिडीओ काढू नका असं त्यांनी अनेकदा सांगितलं. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.
इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वादात अडकले आहेत. २०२० साली एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली.
याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधील घोटी येथील कार्यक्रमादरम्यान करोनासंदर्भात वक्तव्य करताना आपण लस घेतली नाही आणि घेणार ही नाही असं म्हटलं होतं. “मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.
तसेच महिन्याभरापूर्वी इंदुरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात माळा काढणाऱ्यांसाठीच करोनाची तिसरी लाट आहे असं म्हटलं होतं. यावरुनही बराच वाद झाला होता. “दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार,” असं इंदुरीकर म्हणालेले.