हिंगोली : तज्ज्ञ शिक्षकांची रिक्त पदे आणि अपुरी यंत्रसामग्री असल्याचा ठपका ठेवून राज्यातील नऊपैकी आठ प्रस्तावित वैद्याकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने प्रवेश परवानगी नाकारली आहे. केवळ मुंबईतील महाविद्यालयाला १०० ऐवजी केवळ ५० जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील ८५० जाग घटणार आहेत. महाविद्यालयांकडून या निर्णयाविरोधात अपील करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाने मुंबईसह हिंगोली, अंबरनाथ, भंडारा, अमरावती, नाशिक, गडचिरोली, वाशीम, जालना येथे प्रत्येकी १०० प्रवेशक्षमतेची नवी वैद्याकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात वैद्याकीयच्या ९०० जागा एकदम वाढणे अपेक्षित होते. प्रवेशापूर्वी राष्ट्रीय आयुुर्विज्ञान आयोगाच्या तीन सदस्यीय पथकाने २४ जून रोजी पायाभूत सुविधांची तपासणी केली. इमारत, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी इतर भौतिक सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. त्याआधारे विविध त्रुटींवर बोट ठेवत आयोगाने आठ महाविद्यालयांना प्रवेशास परवानगी नाकारली आहे. मुंबईच्या शासकीय वैद्याकीय महाविद्यालयास १०० ऐवजी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मुभा दिली आहे. वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी चार वाजता प्रस्तावित महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची व्हिडीओ कॉन्फरन्सवर बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील शाळा, महाविद्याल्यांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

प्राध्यापकांच्या रिक्त जागा

वैद्याकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी वरिष्ठ निवासीच्या २५, पाठ्यनिर्देशकाच्या ४०, प्राध्यापकांच्या १७, सहयोगी प्राध्यापकांच्या २७ तर तज्ज्ञ सहाय्यक प्राध्यापकांच्या ४१ जागा भरणे आवश्यक आहे. यात हिंगोली व नाशिकमध्ये काही जागा भरण्यात आल्या असून अन्यत्र प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. प्राध्यापकांची भरती करण्याबाबत राज्य लोकसेवा आयोगाला शिफारस करण्यासाठी आरोग्य खात्याला विनंती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१५ दिवसांच्या कालावधीत आयोगाकडे अपील दाखल केले जाईल. त्यांच्याकडून ४५ दिवसांत समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास किंवा परवानगी नाकारल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे अपील करण्यात येईल. शासकीय पातळीवरून त्रुटींची पूर्तता करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

– डॉ. चक्रधर मुंगल, अधिष्ठाता, वैद्याकीय महाविद्यालय, हिंगोली

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmc denies mbbs permission to 8 proposed medical colleges in maharashtra zws
Show comments