सोलापूर जिल्ह्य़ात गारपीट व वादळी वाऱ्यांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देताना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा अडसर राहणार नसल्याचा निर्वाळा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला. मदतीसाठी शासनाच्या आदेशाची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दुपारी उशिरा डॉ. गेडाम यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. गेल्या २६ फेब्रुवारीनंतर ३ मार्च रोजी जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने थैमान घातले. यात गारपिटांसह वादळे वाऱ्यांमुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे अद्यापि सुरूच असून आतापर्यंत सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
२६ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी पडलेल्या पावसासह मागील आठवडय़ात जिल्ह्य़ात १३४ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. परंतु या अवकाळी पावसासोबत वादळी वारे व गारपिट झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते सारख्या  बागायत शेतीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात गारपीट होऊन त्यात द्राक्ष, डाळिंब, ऊस, मका, टरबूज,गहू, भुईमूग, कलिंगड आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ईश्वर वठार, नारायण चिंचोळी, बिटरगाव, अर्जुनसोंड, देगाव, मगरवाडी आदी भागातील नुकसानीची झळ शेतकऱ्यांना बसली आहे. दरम्यान, या नुकसानग्रस्त भागाला माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी धावती भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदतीचे पॅकेज मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Story img Loader