राज्य शासनाने साडेसात कोटीचा निधी न दिल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन लागू शकली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गंभीर दुखापत झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालय किंवा नागपूरला जावे लागत आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी डिजिटल एक्स-रे मशिन लावण्यात आली असून शरीरातील सर्व भागातील एक्स-रे आता येथेच काढले जाणार आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. रुणालयातील असुविधांमुळे गरिबातील गरीब रुग्णांनाही खासगी रुग्णालय किंवा नागपूर मेडिकल कॉलेजचा आधार घ्यावा लागत आहे. कारण, येथील जिल्हा रुग्णालयातील बहुतांश यंत्र सामुग्री नादुरुस्त आहे.
येथे सिटीस्कॅन मशिन येथे उपलब्ध नाही. शहरातील खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन आहे. मात्र, गरीबांना तेथील शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे किमान गरीब रुग्णांसाठी तरी येथे सिटीस्कॅन मशिन लावण्यात यावी, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे अजून तरी सिटीस्कॅनला परवानगी मिळालेली नाही. ही यंत्रणा लावण्यात प्रामुख्याने निधीची अडचण येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. ही यंत्रणा उभारणीसाठी किमान साडेसात कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, तो न मिळाल्यामुळेच स्कॅनिंग मशिन लावण्यासाठी विलंब होत आहे.
पालकमंत्री व आमदार नाना शामकुळे यांच्याही निदर्शनास ही बाब आणून देण्यात आलेली आहे. साडेसात कोटीचा निधी उपलब्ध झाला की, स्कॅिनग मशिन त्वरित लावता येईल. मात्र, निधी कसा व कुठून आणायचा, हा प्रश्न आहे. स्कॅनअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. अपघाताचे रुग्ण आले की त्यांना थेट खासगी रुग्णालयात पाठविण्यात येते. गरिबांसाठी ही अत्यंत खर्चिक बाब आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशिन लावण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. ही मशिन महिनाभरापूर्वीच आणण्यात आली. मात्र, दोन दिवसापूर्वी ते सुरू झाले. गरीब रुग्णांना ही सुविधाजनक गोष्ट झाल्याचेही ते म्हणाले.