राज्य सरकारकडून साहित्य व संस्कृती मंडळावर बाबा भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना मराठवाडय़ातील साहित्यिक व प्रकाशकांनी मात्र त्यावर अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारले आहे. त्याला मसाप निवडणुकीचे संदर्भ असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या निवडणुकीत दोन्ही पॅनेल प्रमुखांनी बाबा भांड यांनी काही मतदारांना दूरध्वनी करावा, असा आग्रह धरला होता. त्यांनी मदत केल्याची आठवण ठेवत प्रतिक्रिया कशाला द्यायची, अशी भूमिका अनेकांनी घेतली. वासुदेवराव मुलाटे व कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पॅनेल निवडणुकीच्या िरगणात आहेत.
दरम्यान, राज्य सरकारकडून साहित्य व संस्कृती मंडळावर नियुक्ती झालेले बाबा भांड अलीकडेच त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार परत करायला निघाले होते. पठण येथील जमीन प्रकरणात त्यांच्यावर अन्याय होत असून, महसूल विभागातील अधिकारी विशेषत: पठणचे तत्कालीन तहसीलदार आणि जिल्हाधिकारी काहीच करीत नाहीत, असा रोष व्यक्त करीत पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. वास्तविक, जमीन प्रकरणांचा आणि त्यांच्या साहित्य पुरस्कारांचा संबंध नसतानाही त्यांनी दिलेल्या निवेदनावर कोणी प्रतिक्रिया दिली नव्हती. साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्षपदावरील भांड यांची नियुक्ती योग्य की अयोग्य यावर औरंगाबादमधून प्रतिक्रिया देण्यास अनेकांनी नकार दिला. त्यामुळेच औरंगाबादकरांचे मौन आश्चर्यकारक मानले जात आहे.
क्लॅश ऑफ इंटरेस्टसचा प्रश्न उपस्थित होऊनही मराठवाडय़ातून त्यांच्या नियुक्तीवर फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत. दरम्यान, केवळ निवडीमुळे बाबा वादग्रस्त होते असे नाही; तर पूर्वी नांदेड जिल्हा परिषदेने कोणतेही निकष न ठरविता बाबा भांड यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार दिला होता. तेव्हा मथू सावंत या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. लेखिका मथू सावंत यांची काही पुस्तकेही बाबा भांड यांनी प्रकाशित केली होती. तेव्हा कुरुंदकराच्या नावाचा पुरस्कार त्यांची महत्त्वाची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या देशमुख अँड प्रकाशन कंपनीच्या सुलोचना देशमुख यांना का नको, असा सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित करण्यात आल्याची आठवण आवर्जून सांगितली जात आहे.
बाबा भांड यांच्या नियुक्तीवरून मराठवाडय़ात अळीमिळी गुपचिळी!
राज्य सरकारकडून साहित्य व संस्कृती मंडळावर बाबा भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना मराठवाडय़ातील साहित्यिक व प्रकाशकांनी मात्र त्यावर अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारले आहे.
First published on: 09-08-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No comments of baba bhand issue in marathwada