ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. हा लढा शेवटपर्यंत लढणार, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ‘रास्ता रोको’ सोडून इतर मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाईल, असेही ते म्हणाले. शेट्टी म्हणाले, सरकारकडून दडपशाही करण्याचा प्रयत्न होतो आहे, मात्र शेतकऱ्यांचा हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहे. मला शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी या आंदोलनाला कुणीही पाठिंबा दर्शविला तरी आम्ही तो घेऊ. कारखाने सुरू करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. आपापल्या भागातील शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे समाधान करूनच कारखाने सुरू झाले पाहिजेत. मात्र, कारखाने चर्चा करायलाच तयार नाहीत. आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू ठेवले होते. चक्का जाम आंदोलन एक दिवसासाठीच होते. शासनाने मला अटक केल्याने काही कटू घटना घटल्या. त्यास शासनच जबाबदार आहे.    
पवारांनी आकडेवारीसह बोलावे’
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, पवार हे अभ्यासू नेते आहेत. कोल्हापुरात किती कारखाने सुरू आहेत व किती गाळप झाले याची आकडेवारी घ्यावी व त्यानंतर त्यांनी बोलावे.

Story img Loader