प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात येथे रविवारी आयोजित केलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत रिकाम्या खुच्र्यावर कार्यकर्त्यांनी बसावे, म्हणून मंत्री राजेंद्र दर्डा यांना धावपळ करावी लागली. मुंबईहून आल्यानंतर केवळ ११ मिनिटांचे भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मात्र, छोटय़ाशा मदानावरील या सभेत रिकाम्या खुच्र्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणारी ठरली. परिणामी शहरातील प्रचारात मुस्लिम आणि दलित वस्त्यांच्या जवळ सभांचे नियोजन केले जात आहे.
शहरातील एन २ भागात ही सभा घेण्यात आली. सभेला गर्दी तशी नव्हतीच. दोन मोठय़ा भूखंडाच्या मदानावर खुच्र्या टाकलेल्या. उमेदवार नितीन पाटील एका कोपऱ्यात बसलेले. व्यासपीठावर पालकमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री दर्डा, मनमोहनसिंग ओबेरॉय, आमदार एम. एम. शेख आदी काँग्रेस नेते बसलेले. श्रोते कमीच. तेवढय़ात आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाट झाला. याच वेळी सभेला आलेल्या महिला उठून जाऊ लागल्या. तशी रिकाम्या खुच्र्याची संख्या वाढली. पाठीमागून मदानावरील रिकाम्या खुच्र्या लक्ष वेधून घेत होत्या. मुख्यमंत्री दोन-चार मिनिटांत येतील, असे वातावरण निर्माण झाले तसे भाषण करून व्यासपीठाभोवती उभे राहिलेल्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी गर्दी केली. किमान मुख्यमंत्र्यांना चेहरा दाखवावा, अशा मानसिकतेत असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुच्र्यात बसून घ्यावे, असे दर्डा यांना सांगावे लागले. पालकमंत्री थोरात यांचे भाषण तेव्हा सुरू होते. त्यांनी शिवसेना उमेदवार व खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. औरंगाबादच्या विकासासाठी काँग्रेस कशी आवश्यक आहे, हे पटवून सांगण्याचा ते प्रयत्न करीत होते. रखडलेली जलवाहिनीची योजना, भूमिगत गटार योजना, खराब रस्ते याचा उल्लेख करत दर्डा यांनीही भाषण आवरते घेतले. तेव्हा केवळ आठ-दहा मिनिटेच शिल्लक असल्याचे सांगत ते खाली बसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केले. कार्यकर्त्यांनी समोरच्या खुच्र्या अडवून ठेवल्याने रिकामेपण काही अंशांनी भरून निघाले. पाठीमागच्या खुच्र्या रिकाम्याच.
गुजरात विकास मॉडेलला जाहीर चच्रेचे आव्हान दिले, तेव्हा भाजपच्या प्रचारातून तो मुद्दा काहीसा कमी झाला. महाराष्ट्र हे गुजरातपेक्षाही प्रगत राज्य आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जोरदार भाषण केले. दहा वाजता प्रचार संपवायचा असल्याने मुख्यमंत्र्यांनी भाषणाची गती वाढवली.
तत्पूर्वी उमेदवार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे राहावे, अशी सूचना कोणी तरी केली. पाटील गोंधळले. कोठे उभे राहावे म्हणजे अनादर होणार नाही, या प्रश्नाभोवती ते रेंगाळले. त्यांच्या हालचालीवरून ही बाब प्रत्येकाच्या लक्षात आली. दर्डा यांनी ही चलबिचल अचूक हेरत मुख्यमंत्र्यांच्या बाजूला कोठे उभे राहायचे, हे सांगितले. खांद्याला धरून त्यांना उभे करून ते परतले, तोपर्यंत वेळ संपत आली होती. मुख्यमंत्र्यांची सभा ११ मिनिटांत संपली. तेव्हा काहीशा उशिराने दोन घोषणा झाल्या. ‘पंजा, पंजा’ असा घोष करणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांना उमेदवार पाटील यांनी साथ दिली.

Story img Loader