दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी महापुरुषांचा फोटो नोटेवर लावावा, अशी मागणी केली. भाजपाचे राम कदम यांनी भारतीय नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावावा, असं म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राम कदमांना टोला लगावला आहे.

‘पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’, असा चिमटा काढत सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, “राम कदम विद्वान आहेत. नशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. अंधभक्ती किती असावी, याचं हे उदाहरण आहे,” असेही सुषमा अंधरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “मनसे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा पक्ष”, शिवसेनेची खोचक शब्दांत टीका

“देवेंद्र फडणवीस यांनी खोक्याचं वाटप समसमान…”

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर ‘खोके’ घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. “बच्चू कडू यांनी खरी गोष्ट समोर आणली पाहिजे. कारण, हा बच्चू कडू यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा फुगा फुगवला आहे. त्याला टाचणी लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे टाचणी लागण्याच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खोक्याचं वाटप समसमान करुन घ्यावं,” असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

Story img Loader