सासवड येथील मराठी साहित्य संमेलनास झालेली अलोट गर्दी म्हणजेच मराठीचा सन्मान होता. संमेलनात कुठलाही वाद झाला नाही. सुसंवादी स्वर लागला की वादाचा प्रश्न येत नाही, असे मत ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
येथील परशराम साईखेडकर नाटय़गृहात सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, नरेश महाजन, मिलिंद जहागीरदार, विनया केळकर, जयप्रकाश जातेगांवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कृतज्ञता हे जगण्याचे मूल्य असते. लेखक मोठे असतात असे नाही. न लिहिणारी माणसेही लेखकापेक्षा मोठी असतात. तानसेनपेक्षा कानसेन महत्वाचा असतो. तेव्हाच गाणाऱ्यास मजा येते. नाशिक सारख्या साहित्याच्या तीर्थक्षेत्रात होणारा सन्मान हा आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. या सत्काराला वाचनालयाची पाश्र्वभूमी आहे. आजवर रसिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. रक्ताच्या नात्यापेक्षा रक्तातून वाहणारी नाती महत्वाची असतात. कार्यक्रमांना रसिकांची उपस्थिती किती यापेक्षा उपस्थितांमध्ये रसिकता किती हे महत्वाचे असते. साहित्य संमेलनात मी ज्या भूमिका मांडल्या, त्या आजीवन सांभाळल्या. मी जातीभेद पाळत नाही. मी माणसांवर प्रेम करणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आपली ‘आई’ कविता म्हटली. फ. मु. शिंदे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्राच्या कवितेचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला. संमेलने ही साहित्याची जत्रा आहे. जत्रा ही माणसाची गरज असल्याने मराठी भाषेची व्यर्थ चिंता करण्याचे कारण नाही, असे विनायकदादा पाटील यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा