राजकारणात प्रवेश कदापिही करणार नाही. अभिनेते कमल हसन यांच्या विश्वरूपम् चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यावर एखाद्या राज्याच्या न्यायालयाने त्यावर बंदी घालणे योग्य नाही. स्त्री-भ्रूण हत्येसारख्या विषयावर सरकार कायदे करत आहे, मात्र समाजानेही आता आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.
परफेक्टनीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता अमीर खान याने अशी स्पष्ट व सडेतोड मते थेट पत्रकारांसमोर व्यक्त करत आपण स्पष्टवक्तेही असल्याचे दाखवून दिले. स्नेहालय संस्थेच्या कार्यक्रमासाठी नगरला आलेल्या अमीर याने संस्थेच्याच सभागृहात पत्रकारांबरोबर संवाद साधला. राजकारणात आपल्याला रस नाही व कधी त्यात पडणारही नाही. प्रत्येकाचे एक क्षेत्र असते. मनोरंजन करणे हेच आपले काम आहे. त्यातून प्रबोधन साधत असेल तर चांगली बाब आहे. युवक आपल्याला आयडॉल समजत असतील तर आनंदच आहे, असे अमीरने सांगितले.
समाजसेवक अण्णा हजारे यांचे काम मोठेच आहे. भ्रष्टाचारासारखा विषय त्यांच्यामुळे देशाच्या अजेंडय़ावर आला. भ्रष्टाचार संपला पाहिजे अशीच देशातील प्रत्येकाची भावना आहे. सरकारच सर्व काही करेल असे समजणे योग्य नाही. स्त्री भ्रुण हत्येसारख्या विषयावर सरकारचकायदे करत असून त्याबाबत समाधान आहे, मात्र समाज काही करणार की नाही हा प्रश्न आहे. समाजाने आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे, असे अमीर म्हणाला. अण्णा, तसेच स्नेहालय संस्थेच्या कामाने आपण प्रभावीत झालो आहोत, असे त्याने सांगितले. चित्रपटांमुळे समाजात हिंसाचार वाढला हे म्हणणे बरोबर नाही. समाजात जे घडते तेच चित्रपटात येते. पोलीस, न्यायव्यवस्था यांनी आपले काम गांभीर्याने केले तर समाजातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहील. त्यानंतरही चित्रपटात हिंसा आली, गुन्हेगारी आली तरच त्यांना नावे ठेवणे बरोबर आहे, असे मत अमीरने व्यक्त केले. समाजात अनेक वाईट घटना घडत असतात, त्यामुळे अनेकदा निराश व्हायला होते, मात्र अशा वेळी त्याच समाजात कुठे ना कुठे तरी चांगले काम सुरू असतेच, त्या कामाशी जोडून घेतल्यावर बरे वाटते. मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, त्यासाठी चांगल्या संहितेच्या शोधात आहे, असे अमीर म्हणाला. फाशीची शिक्षा हवी की नको यावर बोलताना अमीरने या विषयाला दोन बाजू असल्याचे सांगितले. भावनात्मकदृष्टय़ा विचार केला तर फाशी हवी असेच कोणालाही वाटेल, मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यामुळे काय साध्य होणार असाही प्रश्न आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे, लोकशाहीचा तो सर्वात महत्वाचा व लोकांना लोकशाहीबरोबर जोडणारा भाग असल्याचे मत अमीरने व्यक्त केले. सत्यमेव जयते मालिकेचा दुसरा भागही लवकरच प्रसारित होणार असल्याची माहिती त्याने दिली.
‘राजकारणात प्रवेश नाही, मतदानाची सक्ती हवीच’
राजकारणात प्रवेश कदापिही करणार नाही. अभिनेते कमल हसन यांच्या विश्वरूपम् चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यावर एखाद्या राज्याच्या न्यायालयाने त्यावर बंदी घालणे योग्य नाही. स्त्री-भ्रूण हत्येसारख्या विषयावर सरकार कायदे करत आहे, मात्र समाजानेही आता आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे.
First published on: 28-01-2013 at 03:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No entrance in politics polling should compulsory