महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या मंदिरात आता तोकडे कपडे घालणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबाबतचे फलक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाद्वारे मंदिर परिसरात लावले आहेत. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता देशभरातील भविकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात अनेक ठिकाणी असे फलक लावले आहेत. अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले आहेत. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा, अशी विनंतीही फलकाद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २०१८ मध्ये नवरात्री उत्सवादरम्यान कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरबाबत असाच निर्णय घेतला होता. शिर्डीमध्येही अशाप्रकारचे फलक लावले होते. पण लोकांच्या विरोधानंतर हे फलक काढून टाकण्यात आले. या घटना ताज्या असताना आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात मंदिराच्या महाद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी अशाप्रकारचे फलक लावले आहेत.