मंगलदेशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, असे गौरव गीत गाऊन ५३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वच शासकीय कार्यालयासमोर ध्वजरोहण करून महाराष्ट्र दिन साजरा होत असताना विक्रमगड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ध्वजरोहण करण्यासाठी विद्यार्थी तर नव्हतेच, पण शाळेतील एकही शिक्षक अथवा कर्मचारीही उपस्थित न राहिल्याने आज या ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. वाडय़ातील काही महत्त्वाच्या कार्यालययांसह येथील भारतीय स्टेट बँकेलाही झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचा विसर पडला.
विक्रमगड तालुक्यात झडपोली येथे गेल्या दोन वर्षांपासून लाखो रुपये खर्च करून शासनाने भव्य अशा इमारतीमध्ये तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू केले असून, या ठिकाणी ३०० हून अधिक विद्यार्थी विविध व्यवसायाचे शिक्षण घेत आहेत. शिक्षक, कारकून, शिपाई, असा ५० हून अधिक कर्मचारी वर्ग असलेल्या या महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी, तसेच ध्वजारोहणासाठी एकहीजण हजर नव्हता. येथील प्राचार्य ए. के. उपाध्ये यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
भारत सरकारचे नियंत्रण असलेल्या वाडा येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी मोठय़ा उत्साहात झेंडावंदन केले जाते. मात्र आज १ मे महाराष्ट्र दिनी त्यांना झेंडावंदनाचा विसर पडला.
वाडा येथे महाराष्ट्र शासनाचे उपअधीक्षकपद असलेले भूमी अभिलेख कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आज या कार्यालयामध्ये कधीच झेंडावंदनाचा कार्यक्रम होत नाही. येथील उपअधीक्षक एस. एस. आंबोकर यांना विचारले असता ध्वजस्तंभ उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे गेल्या तीन वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे; परंतु आजवर स्तंभ उभारला न गेल्यामुळे झेंडावंदनाचा कार्यक्रम करता येत नसल्याचे आंबोकर यांनी सांगितले. वाडा येथे गेल्या २० वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अधिकाऱ्याचे कार्यालय असून, या कार्यालयात ध्वजस्तंभाअभावी गेल्या २० वर्षांमध्ये स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताकदिन व महाराष्ट्र दिनी झेंडावंदनाचा कार्यक्रमच झालेला नाही. वाडा येथील महाराष्ट्र शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयातही ध्वजस्तंभाअभावी झेंडावंदनाचा कार्यक्रम होत नाही.

Story img Loader