केंद्रीय ‘स्टॅटिस्टिक्स अॅण्ड केमिकल फर्टिलायझर’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आपणास लाल दिव्याचे वाहन मिळणार असल्याचा प्रचार करणाऱ्या एका नगरसेवकाला अखेर आरोपीच्या कठडय़ात उभे रहावे लागले आहे. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या हव्यासामुळे या नगरसेवकाने ओळखपत्र, कार पास, शासकीय पत्रक आणि राजमुद्रा हे सर्व बनावट तयार केल्याचा आरोप आरिफ पठाण या नगरसेवकावर ठेवण्यात आला आहे. महसूल अधिकाऱ्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन महिन्यांपासून आरिफ पठाण व त्याचे समर्थक पठाणंची केंद्रीय स्टॅटिस्टिक्स अॅण्ड केमिकल्स फर्टिलायझरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे बिनदिक्कतपणे सांगत होते. या पदावरील व्यक्तीला लाल दिव्याचे वाहन मिळते. त्यामुळे आता पठाण यांनाही लाल दिव्याचे वाहन मिळणार असल्याचा प्रचार करण्यात येत होता. लाल दिव्याच्या वाहनाचा उद्घाटन सोहळाही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या पत्रिकेत परवानगी न घेताच शासकीय अधिकारी व काही लोकप्रतिनिधींची नावेही टाकण्यात आली होती. परंतु पठाण यांना उपाध्यक्षपद मिळाले कसे आणि लाल दिव्याचे वाहन मिळणार म्हणून एवढा गाजावाजा का, याबद्दल महसूल यंत्रणेतीलच काही अधिकारी साशंक झाले. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे आणि जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी या प्रकरणात लक्ष घातले. प्रादेशिक परिवहन विभागासह थेट स्टॅटिस्टिक्स अॅण्ड केमिकल फर्टिलायझर विभागाशी संपर्क साधण्यात आला. या विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. देवेंद्र वर्मा यांच्याकडे लेखी विचारणा केल्यानंतर त्यांनी २७ जून रोजी पत्राव्दारे अशा पदावर कुणाचीही नियुक्ती झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महसूल यंत्रणेने पठाणविरुद्ध शासन, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीही फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला. धुळे शहराचे मंडळ अधिकारी कैलास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक पठाणविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जी. चौधरी यांनी ‘लाल दिव्याचे वाहन शुभारंभ’ आयोजकांचीही चौकशी करून प्रसंगी गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला आहे.

Story img Loader