गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडल्या जातात. तसेच खासगी वाहनांची संख्याही मोठ्या प्रामाणात वाढते, वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी कोकणाकडे जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. दूध, पेट्रोल, डिझल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन व भाजीपाला इत्यादींची वाहतूक वगळता इतर सर्व मालाची अवजड वाहतूक याकाळात बंद ठेवण्यात येणार आहे.
पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गावरुन होणारी १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त क्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत. १४ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्या पासून ते १७ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
तसेच पाच दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रात्री आठपासून ते २३ सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत या कालावधीत होणारी मोठे ट्रक आणि ट्रेलरची अवजड वाहतूक बंद राहणार आहे. याशिवाय १८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई गोवा महामार्गावर सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
सर्व मालाची अवजड वाहतूक याकाळात बंद ठेवण्यात येणार आहे
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 08-09-2015 at 18:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No heavy truck traffic on mumbai goa highway during ganesh festival