रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात सरकारने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. मात्र, या प्रकल्पाला अनेकांनी कठोर विरोध दर्शवला आहे. याप्रकल्पाबाबत राज ठाकरे मात्र मौन बाळगून होते. या प्रकल्पाबाबत राज ठाकरेंची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरेंनीही बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. तसंच, अशा प्रकल्पांना जमिनी देणाऱ्यांवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे.
“तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभ्या आहेत. जमीन म्हणजे काय? भुगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं राज्य आलं, युद्ध झाले. यांनी तिथे आक्रमण केलं, या सगळ्यांचा इतिहास म्हणून पाहिला तर तो इतिहास भुगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादक्रांत केली, जमीन ताब्यत घेतली. या देशाची, प्रदेशाची जमीन ताब्यात घेतोय. हे जमीन ताब्यात घेतो ना त्याला इतिहास म्हणतात”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आपल्या महाराष्ट्राचा भगवा अटकेपार फडकवला. अटकेपार म्हणजे काय? पाकिस्तानात अटक नावचा जिल्हा आहे. ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे अटकेपार. जमीन पायाखालची काढताय आणि कोणत्यातरी व्यापाऱ्यांना विकताय, आपण कोणासाठी जमीन सोडतोय, काय करतोय याचं भान नाही आपल्याला. तो दाभोळला इन्रॉनचा प्रकल्प आला, तेव्हाही विरोध झाला. तेव्हा जमीन विकली कोणी? तुम्ही. तुम्हाला माहितच नव्हतं येथे प्रकल्प येणार. अणुऊर्जा प्रकल्प येणार आहे माहितच नव्हतं. पण जमिनी विकून मोकळे झालात. पण हजारपट किंमतीला परप्रांतीयांनी जमिनी विकल्या. नाणारलाही तेच झालं, बारसूलाही तेच झालं. आमच्याही जमिनी पायाखालून जातायत, तुम्हाला कळतच नाहीय. किती काळ रडत बसणार आहात?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
“नाणार, बारसू प्रकरणानंतर मला संताप झाला होता. मला एकदा येऊन कोकणवासियांशी बोलायचंच होतं. माझ्या कोकणातील तरुण तरुणींना रोजगार हवाय. काय नाही दिलं या कोकणाला. ज्या गोष्टी कोकणात आहेत, त्यात एक केरळसारखं राज्य चालू आहे. आपण काय घेऊन बसलोय. हे प्रकल्प कधी केरळात नाही जात. गोव्यात नाही जात. तुमच्याकडे निसर्गाने ओतलंय त्याची आम्हाला किंमतच नाही. कारण आमचा एकमेकांशी संबंधच येत नाही. फक्त गणपती होळीपुरता संबंध येतो. काय नाहीय येथे”, असंही राज ठाकरे म्हणाले.