Priyanka Gandhi on Jai Shri Ram: काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर त्या संसदेच्या अधिवेशनात रोज भाग घेत आहेत. प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी काँग्रेस खासदारांसह इतर महिला खासदारही उत्सुक असतात. त्यांच्यासह फोटो काढणे आणि भेटण्यासाठी संसदेच्या आवारात प्रियांका गांधींच्या अवतीभोवती खासदार झुंबड करत असतात. बुधवारी (दि. ४ डिसेंबर) रोजी संसदेच्या आवारात काही महिला खासदारांनी प्रियांका गांधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘जय श्री राम’, असे म्हटले. त्यावर प्रियांका गांधींनी दिलेले उत्तराचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. महिला म्हणून त्या किती सजग आहेत, याबद्दलची चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत असल्यानुसार, संसदेच्या आवारात काही महिला खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतात आणि जय श्री राम असा नारा देतात. यावेळी प्रियांका गांधी आधी जय हिंद असे उत्तर देतात. त्यानंतर पुन्हा म्हणतात, “ऐका, आपण महिला आहोत. जय सियाराम म्हणा. सीतामातेला सोडू नका”

प्रियांका गांधी वाड्रा यांच्या या विधानानंतर महिला खासदारही त्याला हसून दाद देतात. सुप्रिया श्रीनेत यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, जय सीयाराम. आपण महिला आहोत. सीतामातेला सोडून कसे चालेल. प्रियांका गांधींनी महिला खासदारांना सीता मातेची आठवण करून दिली. सीता मातेशिवाय प्रभू राम पूर्ण होऊ शकत नाहीत.

प्रियांका गांधी वाड्रा संसदेत पोहोचल्यानंतर बऱ्याच सक्रिय दिसत आहेत. लोकसभेत बोलताना त्यांनी भूस्खलनग्रस्त पीडितांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी केली. वायनाडमध्ये काही महिन्यांपूर्वी भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली होती. काही गावे यामुळे गाडली गेली. वायनाडच्या खासदार झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा याच प्रश्नाला हात घातला असून पीडितांना अर्थसहाय्य मिळावे, ही मागणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No jai shri ram say to jai siya ram priyanka gandhi vadra to other women member of parliament video viral kvg