सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेले शेखर गायकवाड हे प्रत्यक्षात रुजू न होता सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून जाण्यास राजी झाले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभर सोलापूर महापालिका आयुक्ताविना ‘निर्नायकी’ अवस्थेत सापडली आहे.
महापालिकेत काँग्रेस आघाडीची सत्ता असून यापूर्वी गुडेवार यांची बदली तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात झाली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला फटकारत गुडेवार यांची बदली रोखली होती. त्यावेळी विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने गुडेवार बदली प्रकरणाचे मोठे राजकीय भांडवल केले होते. परंतु राज्यात सत्तांतर होऊन भाजपच्या ताब्यात सत्ता आली असता इकडे सोलापुरात पालिका आयुक्त गुडेवार यांचा कारभार भाजपलाही राजकीयदृष्टय़ा गैरसोयीचा वाटू लागला. विशेषत: महापालिकेच्या मालकीच्या व्यापारसंकुलातील ६०१ गाळे लिलाव प्रक्रिया तसेच थकीत एलबीटी वसुलीमुळे दुखावलेले व्यापारी भाजपवर रुष्ठ झाले. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व खासदार अॅड. शरद बनसोडे यांनाही एवढेच कारण पुरेसे होते. या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आयुक्त गुडेवार यांच्या विरोधात तक्रारी केल्या. नंतर थोडय़ाच दिवसात गुडेवार यांची बदली झाली. यामुळे दुखावलेले गुडेवार यांनीही आपला अवमान सहन करून न घेता आपला पदभार लगेचच सोडला.
आयुक्त गुडेवार यांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात महापालिकेची आर्थिक घडी नीट बसविण्याचा व त्यातून शहराचा भरीव विकास करून प्रशासनाला शिस्त लावण्याचा नेटाने प्रयत्न केला होता. त्यामुळे सामान्य नागरिकात ते कमालीचे प्रिय झाले होते. गुडेवार यांची बदली होताच पालिकेची आर्थिक घडी पार विस्कटली. शहराचा विकास ठप्प झाला असून आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर अदा करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिला नाही. या पाश्र्वभूमीवर गुडेवार यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी शेखर गायकवाड यांची शासनाने सोलापूर महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली होती खरी; गायकवाड हे महिना उलटला तरी महापालिकेत रुजू झाले नाहीत. महापालिकेचा वाईट लौकिक लक्षात घेऊन कोणीही चांगला व कार्यक्षम आयुक्त सोलापुरात येण्यास राजी नसल्याचे सांगितले जाते. गायकवाड यांनीही सोलापुरात येण्याऐवजी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून जाण्यास पसंत केले. त्यामुळे गुडेवार यांच्या पश्चात महावपालिकेचा गाडा आयुक्तांविनाच ‘निर्नायकी’ अवस्थेत चालत आहे. अपर आयुक्त विलास ढगे हे आयुक्तपदाचा प्रभार सांभाळत आहेत.
गुडेवारांच्या पश्चात सोलापुरात पालिकेची ‘निर्नायकी’ अवस्था
सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेले शेखर गायकवाड हे प्रत्यक्षात रुजू न होता सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून जाण्यास राजी झाले आहेत.
आणखी वाचा
First published on: 07-03-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No leader in solapur without commissioner chandrakant gudewar