प्रकाश पोहरे यांच्या गोंडखैरी येथील प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा उचारला नाही. भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील सांत्वन भेट वगळता त्यांनी अकोल्यात चुप्पी साधली. पिरिपाइंच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर धरणे आंदोलन केले. पण, सर्वच राजकीय पक्षांनी मैत्री, नातेसंबंध व आर्थिक हितसंबंध लक्षात घेता वर्तमानपत्राच्या मालकाशी उगाच वैर नको, अशी भूमिका घेत मौन बाळगले.
नानासाहेब वैराळे यांनी अकोल्यात स्थापन केलेल्या ‘देशोन्नती’चे साम्राज्य प्रकाश पोहरे यांनी स्वबळावर विस्तारले. एकाधिकार असताना कापूस आंदोलन असो की, गेल्या काही वर्षांत विजेचे आंदोलन यात प्रकाश पोहरे यांनी समग्र शेतकरी विकास आघाडीच्या झेंडय़ाखाली वादळी लढा दिला. नागपूर जिल्ह्य़ातील गोंडखैरी येथे १३ ऑक्टोबर रोजी पोहरे यांच्या इशाऱ्यावरुन हरिकृष्ण द्विवेदी याने झाडलेल्या गोळीत राजेंद्र दुपारे यांचा मृत्यू झाला. या घटनेने वृत्तपत्र क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली. असे असताना या सर्व प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना, भारिप बमसं यांची अकोल्यात चुप्पी का असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रकाश पोहरे यांच्यासोबत राजकीय नेत्यांचा घरोबा, नातेसंबंध तर आहेतच शिवाय काही राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. शिवसेना नेत्याचा येथील एका जमीन प्रकरणात असलेली अलिखित भागीदारी असो की, वृत्तपत्राचे प्रमुख म्हणून काँग्रेस नेते त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा काढत नाही. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे हे त्यांचे मेहुणे आहेत. त्यांचा मुलगी ऋषीकेश पोहरे राष्ट्रवादीचा प्रदेश महासचिव आहे तर, राष्ट्रवादीचे अमरावतीचे वजनदार नेते व माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख त्यांचे व्याही आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीने हात वर केल्याची प्रचिती पोहरेंना अटकेच्या दिवशी आली. ऋषीकेश पोहरे याच्या पक्षप्रवेशासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी त्यांच्या घरी जात त्यांना पक्षात घेतले. त्याच बरोबर ऋषीकेश यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी पक्षाने सोपविली. त्यानंतर झालेल्या राजेंद्र दुपारे यांच्या हत्या प्रकरणात अकोल्यातून प्रकाश पोहरेंची नाटय़मय अटक अधिक चर्चिली गेली. प्रकाश पोहरे यांना अटक करण्यासाठी नागपूर पोलिसांनी कसब दाखविले. पोहरे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी असलेले नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी कायद्यापुढे सर्व समान हा कित्ता कृतीतून दाखविल्याची चर्चा राष्ट्रवादीत आहे.
पोहरे प्रकरणात राजकीय नेत्यांची चुप्पी
प्रकाश पोहरे यांच्या गोंडखैरी येथील प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा उचारला नाही. भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील सांत्वन भेट वगळता त्यांनी अकोल्यात चुप्पी साधली.
First published on: 06-11-2012 at 01:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No leader ready to talk on prakash pohare matter