जालना मतदारसंघात काँग्रेसने विलास औताडे यांची उमेदवारी जाहीर होऊन दोन आठवडे उलटले, तरी अजून प्रचारासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांची साधी बैठकही न घेतल्याने काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी जिल्हा सरचिटणीस शेख महेमूद यांनी आश्चर्य व्यक्त केले.
जिल्ह्य़ातील मतदारांसाठी औताडे नवखे उमेदवार असून पक्ष कार्यकर्त्यांशीही त्यांची ओळख नाही. मध्यंतरी ते शहरात येऊन गेले असले, तरी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठकही घेतली नाही. जिल्ह्य़ात काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याने औताडे यांच्यासमोर सर्वाना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान आहे, असे शेख महेमूद यांनी म्हटले आहे. जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षावर औरंगाबादच्या काही नेतेमंडळींचे वर्चस्व आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीशी जालन्याचा संबंध असला, तरी उमेदवार निवडणे अथवा अन्य अनुषंगिक बाबींसंदर्भात औरंगाबादची ठराविक नेतेमंडळी अधिकार गाजवितात, असा अनुभव आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद-जालना जिल्हा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक झाली, तेव्हा औरंगाबादच्या पक्षनेत्यांनी जालन्यावर अन्याय केला. या निवडणुकीसाठी जालन्यातून दोघे इच्छुक होते. त्यापैकी एकास उमेदवारी जाहीरही झाली होती. परंतु ऐनवेळी औरंगाबादचा उमेदवार लादण्यात आला. जो उमेदवार पक्षाने दिला व निवडून आला, त्यास काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचे आकर्षण अधिक आहे. निवडून आलेल्या या उमेदवाराने जालन्यात आधी राष्ट्रवादीचा व नंतर काँग्रेस पक्षाचा सत्कार स्वीकारला.
जालना लोकसभा मतदारसंघात जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ांचे प्रत्येकी तीन मतदारसंघ आहेत. या वेळेस जालन्यातून सक्षम इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांना डावलले. औताडे यांना उमेदवारी मिळवून देण्यास औरंगाबादच्या एका प्रभावशाली लोकप्रतिनिधीने पक्षावर दडपण आणले. अलीकडच्या काळात काही व्यक्ती पक्षापेक्षा मोठय़ा होत असून, निवडणुकीत उमेदवार ठरविण्यापासून तो निवडून आणण्यापर्यंत कंत्राटच घेतले जात आहे की काय, अशी शंका कार्यकर्त्यांना येऊ लागली आहे. स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात येऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी काँग्रेस पक्ष औरंगाबादेतील पुढाऱ्यांच्या दडपणाखालीच असल्याचे वाटते. उमेदवारी जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी पक्षाच्या उमेदवारास जालना जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी, असे वाटत नाही. कारण या जिल्ह्य़ातील काँग्रेसला त्यांनी कोणाच्या तरी शब्दावर गृहीत धरलेले असावे, असे वाटते, असा टोलाही शेख महेमूद यांनी लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा