अवषर्णाच्या गर्तेत अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात झालेल्या दमदार पावसामुळे अवर्षणाचे ढग पळून गेले, तर पावसानेही वार्षिक सरासरीजवळ झेप घेतली आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत, तर वान प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्य़ात खरिपाला फटका बसल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बी पिकाला हातभार तर पेयजलाचे संकट दूर करण्यास हातभार लागणार आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्य़ात सरासरी ७०.९६ मि.मी. पाऊस झाला. जळगांव जामोद, मेहकर, बुलढाणा परिसरात हा पाऊस जोरदार बरसला आहे. दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्य़ातील जळगांव जामोद, संग्रामपूर तालुके वगळता अन्य तालुक्यात पावसाने ५० टक्क्यांचा आकडाही पार केलेला नव्हता. मात्र, आज बहुतांश तालुक्यांनी ही टक्केवारी ओलांडली आहे. दुसरीकडे जिल्ह्य़ातील १४ लघु आणि दोन मध्यम व एक मोठा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. अन्य प्रकल्पांमधील जलसाठय़ातही मोठी वाढ झाली आहे. ऑगस्टअखेर जिल्ह्य़ात पेयजलाचे संकट निर्माण होण्याची भीती होती. मात्र, या पावसाने ही भीतीही आता दूर पळवली असून रब्बी पिकांच्या दृष्टीने जिल्ह्य़ात पोषक वातावरण निर्मिती या पावसामुळे झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्य़ात अद्याप कोठे नुकसान झाल्याची माहिती नसून प्रशासकीय यंत्रणाही सतर्क आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ओव्हरफलो झालेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे ८ सप्टेंबर सकाळी ११ वाजता सर्व १९ दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या प्रकल्पातून प्रतिसेंकद १३१२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या हा प्रकल्प ९२.१४ टक्के भरला असल्याने खडकपूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा या तीन तालुक्यांसह परभणी जिल्ह्य़ातील जिंतूर, जालन्यातील मंठा आणि हिंगोली जिल्ह्य़ातील सेनगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन सध्या छोटय़ा-मोठय़ा हालचालींवर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे वान प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले असून प्रतिसेंकद ४३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या प्रकल्पातून होत आहे.
नदीकाठच्या १७ गावांना इशारा
खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आल्याने बुलढाणा जिल्ह्य़ातील नदीकाठच्या येणाऱ्या १७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यात देऊळगांवराजा तालुक्यातील टाकरखेड भागिले, निमगावगुरु, दिग्रस बुद्रुक, दिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगांव, रोहेरी बुद्रूक, रोहेरी खुर्द, ताडशिवणी, लिंगा, पिंपळगांव कुडा, चांगेफळ आणि लोणार तालुक्यातील सावरगाव तेली, खापरखेट, भुमराळा, वझर आघाव, या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोणार तालुक्यातील सावरगांव तेली या गावास प्रसंगी या पाण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.