“काँग्रेस ही गांधी विचारांची आहे आणि राहणार. महात्मा गांधींच्या विचारांशिवाय पर्याय नाही. लोकांना भ्रमित करणं, गोडसेचं समर्थन करणं, गोडसेचं मंदिर उभारणं ही सगळी भूमिका राष्ट्रद्रोहाची आहे. असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केलं. काँग्रेसच्यावतीने आज ‘गांधीदूत’ मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला, या प्रसंगी आयोजित नाना पटोले बोलत होते.
माध्यमांना या मोहीमेबाबत माहिती देताना नाना पटोलेंनी सांगितले की, “एक नवीन मोहीम आज आम्ही महाराष्ट्रात सादर करत आहोत. लोकांना विषारी विचारांपासून दूर करून, वास्तविकता समजावी यासाठी या मोहीमेअंतर्गत काम चालणार आहे. काँग्रेस ही गांधी विचारांची आहे आणि राहणार. महात्मा गांधींच्या विचारांशिवाय पर्याय नाही. ही भूमिका देखील गांधीदूतांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला आहे.”
तसेच, “आपण पाहिलंत की काल कालीचरण नावाचा तथाकथित बाबा याने महात्मा गांधींबद्दल जे अपशब्द वापरले. खरंतर हिंदू लोक गांधींजींचा सन्मान करतात. एवढच नाहीतर जगभरात महात्मा गांधींचा सन्मान केला जातो. पण हिंदूवादी लोकांच्या माध्यमातून गांधीजींना ज्या पद्धतीने अपमानित केलं जातय, खरंतर केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात अशा विचाराल दाबण्याची गरज आहे. म्हणून ही मोहीम काँग्रेसच्यावतीने आम्ही सुरू करत आहोत. जवळपास १० हजार गांधीदूत आम्ही निर्माण करत आहोत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांची संख्या ५० राहणार आहे. असं करून सगळीकडे जिथे जिथे विषारी विचार टाकण्याचा प्रयत्न केला जाणार, तिथे त्याची वास्तविकता समाजासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्यासाठी काम केलं जाणार आहे.” असंही यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं.
याचबरोबर, “छत्तीसगड सरकारने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काल महाराष्ट्रात अकोल्यामध्ये देखील गुन्हा दाखल झाला आहे. काल विधानसभेत देखील आम्ही काँग्रेसच्यावतीने भूमिका मांडली की, त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. महात्मा गांधी हे काय एका जाती, धर्माचे नाही तर ते संपूर्ण देशाचे आहेत आणि अशा तथाकथित बाबांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द काढला, तर त्याचे कायदेशीर परिणाम आगामी काळात त्यांना भोगावे लागतीलच. त्यांनी मापी मागायची की नाही हा त्यांचा भाग आहे. पण महात्मा गांधींपेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही. महात्मा गांधींचा विचारच देशाला तारू शकतो. हे निश्चतपणे समजून सांगण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.” असंही यावेळी नाना पटोले म्हणाले.
“आपला देश हा महात्मा गांधींच्या विचारांचाच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे देशासाठी आदरणीय आहेत आणि त्यांच्याच विचाराने आम्ही काम करतोय. त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करणं हा काही राजकीय मुद्दा नसतो. पण त्यांच्याबद्दलचा अनादर व्यक्त करणं, ही जी काय भूमिका आहे, स्वत:ला फोकस करण्यासाठी तथाकथित लोकांकडून या पद्धतीचा विचार मांडून, लोकांना भ्रमित करणं, गोडसेचं समर्थन करणं, गोडसेचं मंदिर उभारणं ही सगळी भूमिका राष्ट्रद्रोहाची आहे आणि राष्ट्रद्रोहाच्या भूमिकेचं कोणी समर्थन करत असेल तर त्याच्यावर या देशात निश्चितपणे कडक कारवाई व्हावी, अशी आमची भूमिका आहे.” असं पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं.