शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाने आमचे उमेदवार ठरविण्यात खोडा घातला, तसेच अर्ज भरण्याच्या क्षणापर्यंत काही उमेदवार जाहीर होऊ दिले नाहीत, त्यामुळे त्याचा फटका तीन ते चार जागांवर बसला, असा दावा रामदास कदम यांनी केला होता. या दाव्यावर भाजपाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. बच्चू कडू महायुतीचे भाग असले तरी त्यांचेही महायुतीत बिनसले होते.
काय म्हणाले बच्चू कडू?
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, हिंगोली लोकसभेत हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवार शिवसेना शिंदेंचे आणि त्यांना उमेदवारी द्यावी की नाही? हे भाजपाकडून ठरविले जात असेल तर हा अफलातून कारभार आहे.
अजित पवार यांचेही उमेदवार भाजपने ठरवले होते. दोन उमेदवार पडणार असल्याचे सांगून ते बदलण्यास सांगितले गेले. याउलट जिथे भाजपाचेच पदाधिकारी उमेदवार बदला सांगत होते, तिथे मात्र सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्ष केले गेले. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, असे जिल्ह्यातील भाजपा नेते सांगत होते. तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली. हा एकप्रकारे गेमच होता. अमरावतीमध्ये सर्व्हे नकारात्मक असतानाही उमेदवार बदलला नाही आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार तुम्ही बदलण्यास भाग पाडले.
घटक पक्षांना बरोबर घेऊन अशा प्रकारचे वागणे चुकीचे आहे. या वृत्तीमुळे भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असेही विधान बच्चू कडू यांनी केले. काही प्रमाणात भाजपाकडूनच गेम झालेला आहे, असेही ते म्हणाले.
जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्यामुळे पोलिसांकडे तक्रार
जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबाबत सांगून या विषयावरही बच्चू कडू यांनी भूमिका मांडली. मला कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत की माझा अपघात झाला आहे का? मतदान झाल्यानंतर चांदुरबाजार येथील हॉटेलमध्ये काही लोक बसले होते. बच्चू कडू यांचा गेम करायचा आहे, अशी त्यांची चर्चा सुरू होती. काही कार्यकर्त्यांनी माझ्या कानावर ही बाब घातली. तसेच आनंद दिघे यांच्याप्रमाणेच बच्चू कडू यांचा गेम करू, अशी चर्चा अचलपूरच्या बाजारात काही लोकांनी केली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाचे लोकसभा उमेदवार दिनेश बुब यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीनंतर माझ्यासोबत असे होत आहे. या चर्चा आताच का सुरू झाल्या? अशी शंका आल्यामुळे आम्ही जिल्हा अधिक्षकांना पत्र लिहून तक्रार केली आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.