सर्वपक्षीय सत्तेचा ‘पॅटर्न’ अस्तित्वात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आसाराम लोमटे, लोकसत्ता

परभणी : ना सदस्यांची पळवापळवी ना आकडय़ांची जुळवाजुळव.. रस्सीखेच तर अजिबात नाही. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकत्रच, त्यामुळे  पुढच्या अडीच वर्षांत जिल्हा परिषदेत विरोधी आवाज घुमणार नसल्याने सर्वपक्षीय सहमती पाहायला मिळणार आहे.. पण जिल्हा परिषदेतून विरोधी पक्ष  बेपत्ता झाल्याने आता ‘आपण सारे भाऊ भाऊ’ असे चित्र दिसणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड मंगळवारी पार पडली. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग अस्तित्वात आल्यानंतर परभणीतही राष्ट्रवादी व शिवसेना यांची सलगी वाढली होती. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद तर शिवसेनेकडे उपाध्यक्षपद द्यावे अशी रचनाही आकाराला येत होती. मात्र, गेल्या आठवडय़ात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष ही दोन्ही पदे राष्ट्रवादीने स्वत:कडे घेतली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर पराभूत झाले होते. त्यांचा आत्मविश्वास खचल्याने पुन्हा त्यांना सत्तेची उभारी मिळावी म्हणून त्यांच्या मातोश्री निर्मलाबाई विटेकर यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भूमिका निर्णायक ठरली.

उपाध्यक्षपदही राष्ट्रवादीकडेच राहणार हे सर्वपक्षीय नेत्यांच्या बठकीतून स्पष्ट झाले होते. त्यावरही आज शिक्कामोर्तब झाले. जिंतूर विधानसभा मतदारसंघात विजय भांबळे यांना पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादीतला त्यांचा जिल्हा परिषदेतील गट जिंतूरकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद असावे यासाठी आग्रही होता. राजेंद्र लहाने, अशोक चौधरी या समर्थकांची नावे त्यासाठी चच्रेत होती. आज चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भांबळे यांच्या म्हणण्याप्रमाणे उपाध्यक्षपद त्यांच्या तालुक्याला द्यावे यासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनीही जिल्हाध्यक्ष बाबाजानी यांच्याशी संपर्क साधला. अशाप्रकारे दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे आली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळावे यासाठी आमदार राहुल पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. आज सकाळी पाटील यांच्या निवासस्थानी बाबाजानी, भांबळे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींची बैठकही झाली. या बठकीतही शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळावे, असा आग्रह आमदार पाटील यांनी कायम ठेवला होता. बिनविरोध निवडीची प्रक्रिया पार पडत असल्याने आणि शिवसेना या प्रक्रियेत संपूर्ण सहकार्य करीत असल्याने सेनेकडे उपाध्यक्षपद दिले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आपल्या समर्थकांसाठी दोन्ही पदांबाबत ठाम राहिल्याने शिवसेनेला पुढे एका सभापतिपदावर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याबाबत बाबाजानी यांची अनुकूलता होती. मात्र, भांबळे यांचा आग्रह आणि त्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला हस्तक्षेप यामुळे शिवसेनेला उपाध्यक्षपदाचा हट्ट सोडावा लागला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीच्या निमित्ताने बाबाजानी, भांबळे या राष्ट्रवादींच्या नेत्यांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार राहुल पाटील हे सर्वजण एकत्र आले. त्यातूनच सर्वाच्या सहमतीचे नवे सत्ताकारण जिल्हा परिषदेत पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेतला हा नवा पॅटर्न परभणीने स्थानिक स्वराज्य संस्थेचा राजकारणाला दिला असला तरी आता जिल्हा परिषदमध्ये पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी कोणताही पक्ष उरला नसल्याने ही जिल्हा परिषद विरोधी पक्ष मुक्त झाली आहे.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No opposition remain in parbhani zilla parishad zws