शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असतानाच आता शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्याने सिनेनिर्मात्यांना इशारा दिला आहे. बाळा लोकरे यांनी ही पोस्ट टाकली आहे. २५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा बाळा लोकरे यांनी दिला आहे.
बुधवारी ठाकरे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीने मुख्य भूमिका साकारली असून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली. ‘ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे, या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे. तर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा लोकरे यांनी ‘२५ जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ’, असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी बाळा लोकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेची लिंक शेअर करत टीका केली आहे. ‘ही केवळ झुंडशाही असून याचा निषेध आहे’, असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.