ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे यांच्या संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज एसआयटी प्रमुख व सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी शनिवारी प्रसिद्ध केले. मात्र तीन महिन्यानंतरही पानसरे यांच्या मारेकऱ्यांबाबत कोणत्याही ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचलो नसल्याची कबुली संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांच्या सांगण्यावरून हे रेखाचित्र तयार केले आहे. गोिवदराव पानसरे यांच्यावर हल्ला करण्याआधी मारेकरी त्यांच्या पाळतीवर होते, तसेच ते हिरो होंडा स्प्लेंडर गाडीवरून आले होते. हल्ल्यानंतर ते सुभाषनगर, आर. के. नगर माग्रे कर्नाटककडे रवाना झाले असल्याचे तीन महिन्यांच्या अथक तपासाअंती स्पष्ट झाले असल्याचे कुमार यांनी सांगितले. मात्र संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे उमा पानसरे यांनी अद्यापही ओळखली नसल्याने यास पुष्टी देणे कठीण असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
पानसरे हत्याप्रकरणी तपासाचा आढावा घेण्यासाठी एसआयटी प्रमुख संजय कुमार हे शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले होते. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करण्यापूर्वी उमा पानसरे यांना त्यांच्या दारात दोन दुचाकीस्वारांनी इथे मोरे कुठे राहतात असा मराठीत पत्ता विचारल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. यास कुमार यांनी आज पुष्टी दिली. फिरावयास जाण्याआधी उमा पानसरे आपल्या घराच्या दारात उभ्या असताना अज्ञातांनी पत्ता विचारल्याचे कुमार यांनी सांगितले. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करण्याआधीपासून हल्लेखोर त्यांच्या पाळतीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साक्षीदार व मिळालेल्या फुटेज आधारे पोलिसांनी दोन साक्षीदारांची आठ रेखाचित्रे तयार केली आहेत. संशयित हल्लेखोरांनी टोपी परीधान केल्यावर, दाढी असताना, दाढी नसताना, अशा विविध ४ अँगलनी हल्लेखोरांचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करण्यापूर्वी त्यांना मराठीत शिवी दिल्याचेही संजय कुमार यांनी सांगितले. हल्लेखोरांनी आपण स्थानिक असल्याचे भासविण्यासाठी मराठीत शिवी दिल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
तपास पथकांची पुनर्बाधणी..
पानसरे दाम्पत्यावरील हल्लेखोरांच्या तपासासाठी २० पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये आणखी पथकांची भर घालून यांची संख्या २५ करण्यात आली होती. मात्र या पथकांची पुनर्बाधणी करून नव्याने ८ पथके तपासासाठी तनात केली आहेत. ही आठ पथके त्यांना ठरवून दिलेल्या दिशेने तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2015 रोजी प्रकाशित
पानसरेंच्या मारेकऱ्यांची ठोस माहिती नाहीच!
तीन महिन्यानंतरही पानसरे यांच्या मारेकऱ्यांबाबत कोणत्याही ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचलो नसल्याची कबुली संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First published on: 07-06-2015 at 05:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No perfect information about govind pansare assassins sanjay kumar