उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लाक्षणिक उपोषण करू देण्यास उस्मानाबाद शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोमवारी (दि. १४) हजारे उपोषण करणार होते. मात्र, कायदा-सुव्यवस्थेची सबब पुढे करीत पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. दरम्यान हजारे यांनी नगर येथे सांगितले की, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती आहे, त्यामुळे मिरवणुकांच्यावेळी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागणार आहे तसेच निवडणुकीमुळेही पोलिसांवर ताण आहे त्यामुळे उपोषणास त्या दिवशी परवानगी नाकारणारे पोलिसांचे पत्र आपल्याला मिळाले आहे. त्यांनी दिलेले कारण सयुक्तिक वाटल्याने आपण हे उपोषण त्या दिवशी न करता दुसऱ्या एखाद्या दिवशी करू, त्याबाबत पोलिस प्रशासनाला कळवले जाईल.
डॉ. पाटील यांच्याविरोधात प्रचारासाठी हजारे यांनी येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर डॉ. पाटील यांनीही आव्हान दिले होते. ते स्वीकारत हजारे यांनी उपोषणाचा दिवसही जाहीर केला. मतदारसंघात जनजागृतीसाठी हजारे यांनी सहा पानी पत्रकही तयार केले. न्या. पी. बी. सावंत आयोगाच्या अहवालातील मुद्दे, तेरणा कारखान्यातील गरव्यवहार, निधीचा अपहार, पवन राजेिनबाळकर हत्याप्रकरणातील आरोपी पारसमल जैन यांच्या जबाबातील वाक्य आदींचा या पत्रकात समावेश आहे. तसेच निष्कलंक उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी पत्रकाद्वारे केले. या पत्रकाच्या प्रती मतदारसंघात वाटल्या जात आहेत.
उस्मानाबादेत पद्मसिंहाच्या विरोधात अण्णांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार!
उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लाक्षणिक उपोषण करू देण्यास उस्मानाबाद शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
First published on: 10-04-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No permission for anna hazare fast