आमदार, मंत्री व विधानसभेचे अध्यक्षपद भूषविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी आपल्याकडे आता कुठलेही पद नसल्याबद्दल शल्य व्यक्त केले. पद नसले तरी माझी पत मात्र कायम आहे, असा दावा त्यांनी करत राजकारणात झालेल्या बदलावर मार्मिक कोरडे ओढले.
प्रथम नगराध्यक्ष स्व. रामचंद्र महाराज उपाध्ये यांच्या स्मृतिनिमित्त नगरपालिकेने आयोजित केलेल्या स्मृतिव्याख्यानमालेत गुजराथी यांनी पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक, आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहरातील ज्येष्ठ नागरिक माजी आमदार बाबूराव चतुर्भूज, कुंडलिक गिरमे, बाबासाहेब डावखर, विमल वाणी, प्रभाकर शिंदे, कौसल्याबाई खटोड, सुमनभाई शहा, मोहन संचेती, गिरीधारीलाल गुलाटी, बजरंग गुळस्कर, नारायण उपाध्ये, विठ्ठल गाडेकर, जगजितसिंग चुग, जनकभाई आशर, रमजानी शेख, कांतिलाल भंडारी यांचा सत्कार करण्यात आला.
गुजराथी यांनी येथील ज्योतिषी भंडारी यांना तुम्ही साऱ्या भारतभर भविष्य पाहता आमचंही भविष्य बघा, असे विनोदाने म्हटले. आता माझ्याकडे कुठलेही राजकीय पद नाही, पत मात्र कायम आहे. त्यामुळे मला राज्यभर कार्यक्रमाला बोलावले जाते. आदिक व शिंदेंचे आशीर्वाद मला कायम मिळालेले आहेत. भविष्य बघण्यापेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे. पैशाने व पदाने सेवा होत नाही. आज राजकारणात व्यक्तिगत सेवेला महत्त्व आले आहे. विकास व लोकशाहीत अंतर पडत आहे. चारित्र्य तर सांभाळलेच पाहिजे, पण दायित्वही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बदलत्या राजकारणावर गुजराथी म्हणाले, पूर्वी विकासकामांना महत्त्व दिले जात असे. पण आता व्यक्तिगत सेवेला महत्व आले आहे. कार्यकर्त्यांला आणि मतदाराला वारंवार भेटावे लागते. विकासकामांऐवजी त्यावरच लक्ष केंद्रित करावे लागते. कार्यकर्त्यांचा अनुनय करावा लागतो. व्यक्तिगत कामात महत्वाकांक्षा या अवाजवी असतात. निवडणुका जिंकण्याकरिता वेगवेगळे मार्ग अनुसरावे लागतात. यामुळे शेवटच्या माणसाला सामाजिक न्याय देता येत नाही. त्यामुळे हा माणूस कधी ना कधी नेत्यांचाही शेवट करील हे नेत्यांनीच लक्षात घेण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

Story img Loader