काही दिवसापूर्वी महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांच्या घरी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा केली होती. त्यास जनतेने जोरदार विरोध केला. महाविकास आघाडीनेही या निर्णयाचा कडाडून विरोध केला. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की, स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मात्र सरकारकडून अशा पद्धतीचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. तसेच महावितरणनेही याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मागणी केली होती की महावितरणने स्मार्ट मीटरबाबतचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. कोल्हापुरात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना अधिकृत निवेदनही दिलं होतं. त्यानंतर आता महावितरणने जाहीर केलं आहे की सामान्य ग्राहकांच्या घरी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महावितरणने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MOP), भारत सरकारच्या (Gol) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाहीत.

कोल्हापूरमध्ये सोमवारी (२४ जून) आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सर्वसामान्य जनतेस स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती करू नये असं निवेदन दिलं होतं. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आर. के. पोवार, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील, अमरीश घाटगे, जावेद मोमीन, चंद्रकांत पाटील, राजू सूर्यवंशी, बाबासो देवकर यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा >> महायुतीत जुंपली; “आम्हाला हलक्यात घेऊ नका”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा, शिंदेंच्या आमदारानेही सुनावलं

दरम्यान, स्मार्ट प्रीपेड मीटर्समुळे राज्यात चार लाख लोक बेरोजगार होतील, अशी भिती मविआने व्यक्त केली होती. तसेच सतेज पाटील यांनी मविआ स्मार्ट मीटर्सविरोधात व्यापक लढाई लढेल असं म्हटलं होतं. त्याचबरोबर याविरोधात मोठं आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याची घोषणा केली होती. तसेच हे मीटर खासगी कंपनीच्या खर्चाने मोफत बसले जातील अशी अफवा देखील पसरली होती. यासंदर्भात निविदा मंजूर केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काँग्रेससह मविआने याविरोधात आवाज उठवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No prepaid smart meters are being installed to common consumers says msedcl asc