खासगी खरेदीदाराचे भाव सरकारच्या हमीभावापेक्षा कमी असल्याने या वर्षी जालना बाजार समितीच्या आवारात कापसाची उलाढाल मोठय़ा प्रमाणावर वाढली. गेल्या वर्षी गुजरातमध्ये खासगी खरेदीदारांकडे मोठय़ा प्रमाणावर कापूस गेला होता. चालू हंगामात जानेवारी अखेरपर्यंत जालना मार्केट यार्डात २ लाख ७९ हजार क्विंटल कापूस आला. मागील हंगामात याच कालावधीपर्यंत १ लाख ९ हजार क्विंटल कापूस आला होता. या हंगामातील सर्व खरेदी ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)मार्फत सरकारच्या हमी भावाने होत आहे.
कापूस खरेदी केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ‘सीसीआय’ने जालना परिसरातील सात जिनिंग-प्रेसिंगसोबत करार केला. परंतु खरेदी केलेला कापूस ठेवण्यास जिनिंग-प्रेसिंगमध्ये जागाच शिल्लक राहिली नसल्याने २६ ते ३१ जानेवारी दरम्यान खरेदी थांबविण्यात आली. दि. २ जानेवारीपासून जालना बाजार समिती यार्डात पुन्हा खरेदी सुरू झाली. गेल्या १५ नोव्हेंबरनंतरच्या अडीच महिन्यांतील जालना मार्केट यार्डात आवक २ लाख ७९ हजार क्िंवटल असली, तरी प्रत्यक्षात याच बाजार समितीच्या बदनापूर उपआवारातही जवळपास एक लाख क्विंटल आवक झाली.
जिल्ह्य़ातील परतूर, अंबड, मंठा, भोकरदन बाजार समित्यांच्या क्षेत्रातही ‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी सुरू आहे. गेल्या अडीच महिन्यांत जिल्ह्य़ात सात लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. गेल्या वर्षीप्रमाणे गुजरातमध्ये कापूस जात नसल्याने सर्व आवक जिल्ह्य़ातील बाजार समित्यांच्या क्षेत्रातच होत आहे.
चालू हंगामात (२०१४-१५) ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान २ लाख ४ हजार ७७५ क्विंटल मकाची आवक झाली आहे. मागील वर्षी याच काळातील ही आवक ५ लाख २ हजार ५८८ क्विंटल होती. जिल्ह्य़ातील मका पिकाखालील क्षेत्र यावर्षी अगोदरच्या वर्षांच्या तुलनेत वाढ झाली. परंतु कमा पावसामुळे उत्पादन मात्र मोठय़ा प्रमाणावर घटले. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान तुरीच्या आवक ९९ हजार ७७३ क्विंवटल होती. परंतु यावर्षी याच काळातील आवक १२ हजार ६२४ हेक्टर आहे. मागील वर्षभरात (एप्रिल १३ ते मार्च १४) दरम्यान तुरीची आवक १ लाख ३६ हजार क्विंटल होती. दरवर्षी जानेवारीपासून तुरीची आवक वाढत जाते. चालू वर्षी जिल्ह्य़ातील शेतकरी अगोदरच्या तुलनेत सोयाबीन पिकाकडे अधिक वळला. परंतु सोयाबीनचा उतारा मात्र मोठय़ा प्रमाणावर घसरला. गेल्या हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान ४ लाख ६० हजार क्विंटल आवक असलेल्या सोयाबीनची चालू हंगामातील याच काळातील आवक १ लाख ८६ हजार क्विंटल एवढी कमी आहे.
मागील चार महिन्यातील मोसंबीची आवक ४० हजार ४०० क्विंटल असून अगोदरच्या वर्षी याच काळात ही आवक २२ हजार क्विंटल होती. मागील चार महिन्यांतील गुळाची आवक २९ हजार क्विंटल असून मागील हंगामातील याच काळाच्या तुलनेत ती जवळपास १३ हजार क्विंटलने अधिक आहे. एप्रिल १३ ते मार्च १४ या बारा महिन्यांत ३७ हजार क्विंटल मुगाची आवक झाली होती. यावर्षी मागील चार महिन्यांतील मुगाची आवक ९ हहजार ६०० क्विंटल आहे. यावर्षी मुगाच्या उत्पादनास मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी (एप्रिल १३ ते मार्च १४) ज्वारीची आवक १ लाख ९ हजार क्विंटल होती. यावर्षी मागील चार महिन्यांतील ही आवक ३५ हजार क्विंटल असून अगोदरच्या वर्षांतील याच काळाच्या तुलनेत २ हजार क्विंटलने अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा