राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर यापुढे पुणेरी पगडीने कोणाचेही स्वागत करू नका, स्वागत करायचेच असेल तर महात्मा फुले यांच्या फुले पगडीने स्वागत करा असा आदेश दस्तुरखुद्द शरद पवारांनीच दिला आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी छगन भुजबळ यांना फुले पगडी घातली. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचनावजा आदेशच दिला आहे. पुणे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पारंपारिक पुणेरी पगडी. मात्र याच पुणेरी पगडीचा तिटकारा शरद पवारांना आल्याची चर्चा आहे. पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीच घालून स्वागत केले गेले पाहिजे अशी सूचना करून त्यांना कोणते सोशल इंजिनिअरींग साधायचे आहे हे स्पष्ट होते आहेच.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार केल्याची घोषणाच त्यांनी कार्यक्रमात केली. छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात जात, धर्म, समाज यांना सोबत घेऊन जाऊ असे म्हटले होते. त्यानंतर पवारांनी गुगली टाकत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी नको असा हुकूमच देऊन टाकलाय.
जाणून घ्या पुणेरी पगडीचा इतिहास
दरम्यान शरद पवार यांना निवडणुकांच्या तोंडावर जात आठवते असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पुणेरी पगडी संदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर शरद पवार जातीय ध्रुवीकरण करत आहेत असा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. तर शरद पवारांनी जातीय सलोखा टिकवला पाहिजे असा सल्ला काँग्रेसनेही दिला आहे. शरद पवार जे काही बोलतात ती बातमी होते. पगडीबाबत ते बोलले आणि तेव्हापासून सोशल मीडियावरही पवारांना पुणेरी पगडीचा तिटकारा किंवा अॅलर्जी का? याची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर अनेकांनी शरद पवारांच्या या भूमिकेवर टीकाही केली आहे.