कमालीच्या उष्म्याने कहर केला असताना आज सायंकाळी ढग दाटून येऊन जोरदार पावसाची लक्षणे तयार झाली असतानाच त्याने केवळ शिडकावा करत कराड, पाटण शहराला हुलकावणी दिली. दरम्यान गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन ठिकठिकाणी कोसळलेल्या पावसाने घरांचे पत्रे उडून जाणे, गोरगरिबांच्या झोपडय़ा व उभी पिके जागीच झोपणे असे प्रकार घडले आहेत. हा पाऊस वडुजसह दुष्काळीपटय़ात कोसळल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, कोयना, धोम-बलकवडीसह पाण्याचा सुकाळ असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा चिंताजनक असून, वांग-मराठवाडी, हातगेघर, महू यासह सर्व छोटय़ा प्रकल्पात पाण्याचा खडखडाट झाला आहे.
आजचा अवकाळी पाऊस जोरदार कोसळेल असे वातावरण निर्माण झाले, परंतु पावसाने सामान्यजनांची घोर निराशाच केली. दरम्यान, कराड व पाटण तालुक्यात सर्वत्र असेच वातावरण राहिल्याचे, तर काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे. आज सायंकाळी जोरदार पावसाची अपेक्षा फोल ठरली असलीतरी हवेत गारवा असल्याने पश्चिम विभागात पाऊस झाला असल्याची शक्यता आहे.
पावसाळय़ाचा हंगाम सुरू होण्यास तब्बल एक महिना बाकी असताना, कोयना धरणासह ठिकठिकाणच्या पाणी साठवण प्रकल्पात चिंताजनक पाणीसाठा आहे. कोयना प्रकल्पात २५.५० टीएमसी म्हणजेच २४ टक्के पाणीसाठा असून, दुसऱ्या लेकटॅपिंगमुळे प्रथमच धरणात आजमितीला सर्वात कमी पाणीसाठा असूनही जलविद्युत निर्मिती व कोयना नदीतून पूर्वेकडील विभागाला पाणी पुरवणे शक्य झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. उरमोडी, धोम व कण्हेर या मध्यमप्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा असल्याची आकडेवारी आहे. मात्र, उर्वरित छोटय़ा प्रकल्पांचा पाणीसाठा तळ गाठून तर, काही प्रकल्पात पाण्याचा खडखडाट अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे यंदाचा पावसाळा सुरू होण्यापर्यंत पाण्याची चणचण राहणार नाही, असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, उन्हाच्या दाहकतेमुळे तसेच शेतीसाठी व पिण्यासह वैयक्तिक पाणी वापराच्या नियोजनाअभावी पाण्याची दाहकता उभी ठाकली असल्याचे म्हणावे लागणार आहे.
कराड, पाटणला पावसाची हुलकावणीच
कमालीच्या उष्म्याने कहर केला असताना आज सायंकाळी ढग दाटून येऊन जोरदार पावसाची लक्षणे तयार झाली असतानाच त्याने केवळ शिडकावा करत कराड, पाटण शहराला हुलकावणी दिली.

First published on: 04-05-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No rain in karad and patan