हेमेंद्र पाटील
स्थानिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष
पालघर जिल्ह्य़ातील तलासरी-डहाणू परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून भूकंपाचे जोरदार धक्के बसत असतानाही बोईसर पूर्वेकडील दगडखाणीत घडवल्या जाणाऱ्या स्फोटांवर मात्र कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. भूकंपाच्या अनेक कारणांपैकी एक कारण खदाणीतील स्फोट असल्याचे समोर आले असतानाही जिल्हा प्रशासनाने येथील बेसुमार स्फोटांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
बोईसर पूर्वेकडील नागझरी, निहे, किराट, लालोंडे, गुंदले या भागातील खदानीतून दररोज लाखो ब्रास दगड उत्खनन केला जातो. येथील दगडखाणींची खोली १०० फूटपेक्षा जास्त खोल गेली असतानाही महसूल विभाग खदानमाफियांना नियमबाह्य रॉयल्टी देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार दगड खदानीसाठी २० फूट खोल खोदकाम करण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र एकदा गौणखनिज रॉयल्टी दिल्यानंतर स्थानिक तलाठय़ांकडून कोणत्याही प्रकारचा अहवाल पुन्हा घेतला जात नाही. त्यामुळे येथील खदानमाफियांना मोकळे रान मिळत असून खदानी शेकडो फूट खोल गेल्या आहेत. त्यातच खदानींमध्ये एकाच वेळी जास्त दगड मिळावा यासाठी खोलवर स्फोट घडवले जातात. याचाच दुष्परिणाम आज पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भोगावा लागत आहे.
जिलेटिन स्फोटके वापरून खणल्या जाणाऱ्या दगडखाणींमुळे डहाणू व तलासरी भागात सौम्य स्वरूपाचे भूकंप धक्के बसल्याची शक्यता राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हैदराबाद व बंगळूरु या शहरांच्या परिसरातही भूपृष्ठावर खोदकाम केल्याने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समजते. दगड खदानींमध्ये स्फोट करण्यासाठी आठ फूट खोल खड्डे तयार केले जातात. या खड्डय़ात स्फोट जास्त प्रमाणात व्हावा यासाठी चार जिलेटिन कांडय़ा आणि एक डिटोनेटर लावले जाते. अशा प्रकारे केलेल्या स्फोटाचे कंपन जमिनीत खोलवर पोहोचत असते. पहिल्याच खोलवर गेलेल्या खदानी आणि त्यामधील होणाऱ्या बेकायदा स्फोटामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. खदानींमध्ये स्फोट करण्यासाठी ‘कंट्रोल ब्लास्ट प्रणाली’ वापरणे गरजेचे आहे. मात्र ही प्रणाली खर्चीक असल्याने तिचा वापर केला जात नाही. घरांना तडे
या भागातील खदानींमध्ये केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे आसपासच्या अनेक घरांना मोठय़ा प्रमाणात तडे गेले आहेत. स्फोटामुळे रहिवाशांच्या घरातील भांडीही हलतात, असे काही रहिवाशांनी सांगितले. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. या परिसरातील दगडखाणींमधून कोटय़वधीचा महसूल शासनाला मिळत असल्याने कारवाइ केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
या परिसरातील नियमापेक्षा जास्त खोदकाम केलेल्या दगडखाणींची तपासणी करण्यात आली आहे. बेसुमार खोदकाम केलेल्या दगडखाणींवर कारवाई करण्यात येईल.
– विकास गजरे, प्रांत अधिकारी, पालघर