त्रिपुरामध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या यामध्ये प्रामुख्याने अमरावतीमध्ये परिस्थिती अधिकच बिघडल्याचे दिसून आले. तर, या हिंसाचाराच्या घटनांवरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर दररोज आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना एक मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.
“भाजपाच्या राज्यात दंगली होत नाही, महाविकासाआघाडी सरकारच्या राज्यात किंवा तथाकथित सेक्युलर, डाव्या विचारांच्या राज्यात दंगली होतात. कारण, या दंगलीला संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं, प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं. सरकारमधील मंत्री करतात, हा माझा स्पष्ट अनुभव आहे. ” असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत यांनी सांगणं म्हणजे…
पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा नेते अनिल बोंडे यांनी सांगितलं की, “मी माझ्या कालच्या ट्विटरवर केलेल्या संभाषणावर पूर्णपणे ठाम आहे कारण, मी जे काही बोलतो ते शुद्धीत बोलतो. कोणतीही हर्बल तंबाखू खाऊन बोलत नाही, कोणतीही दारू पिऊन बोलत नाही. त्यामुळे नवाब मलिक सारखं बेशुद्धीत विधान करायची माझी सवय नाही आणि म्हणून मी जे बोललो त्यावर कायम आहे. भाजपाच्या राज्यात दंगली होत नाही, महाविकासाआघाडी सरकारच्या राज्यात किंवा तथाकथित सेक्युलर, डाव्या विचारांच्या राज्यात दंगली होतात. कारण, या दंगलीला संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं, प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं. सरकारमधील मंत्री करतात, हा माझा स्पष्ट अनुभव आहे. ”
पालकमंत्र्यांना पूर्वनियोजित दंगल वाटते आहे, तर त्यांनी… –
तसेच, “पालकमंत्र्यांना पूर्वनियोजित दंगल वाटते आहे. तर त्यांनी त्यांच्या गृहखात्याकडून तपास करावा आणि १२ तारखेच्या अगोदर जेवढे काही फुटेजेस आहेत, आम्ही द्यायाला तयार आहोत. आम्ही त्यांचे व्हॉट्स अॅप, व्हिडिओ द्यायला तयार आहोत. त्या सर्वांवर कारवाई करण्याची हिंमत पालकमंत्र्यांनी दाखवावी.” असं आव्हान देखील भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिलं आहे.
अमरावतीमध्ये काय घडलं?
भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला नंतर हिंसक वळण लागलं. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजपाच्या १४ नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं..