– धमकीला भीक घालणार नाही – एम. फुक्टो.
विद्यापीठ परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापकांचे एप्रिल महिन्यात देय असलेले मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना दिले आहेत. प्राध्यापकांच्या सेवा अत्यावश्यक करून त्यांच्याविरुद्ध ‘एस्मा’ लावण्याची तयारीदेखील शासनाने केल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे.
त्याप्रमाणे राज्यातील सर्व अकराही अकृषक ब संलग्न जवळपास साडेअकराशे खासगी अनुदानित महाविद्यालयातील संपावर असलेल्या प्राध्यापकांचे मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेश पुणे, पनवेल, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांनी आपापल्या विभागातील खासगी अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्याना दिले आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ.पी.आर. गायकवाड यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’ला दिली. प्रत्येक महाविद्यालयात किती प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकलेला आहे, याबद्दलची माहिती घेण्यात आली असून अशा प्राध्यापकांविरुद्ध ‘एस्मा’ लावण्याची तयारीदेखील शासनाने केल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. ‘नो वर्क, नो पे’ अर्थात ‘काम नाही तर दाम नाही’ अशी शासनाची स्पष्ट भूमिका असल्याने संपकरी प्राध्यापकांचे एप्रिल महिन्यात देय असलेले मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.
प्राध्यापकांचे वेतन अदा न करण्याचा सरकारला कोणताच अधिकार नसल्याची महाराष्ट्र प्राध्यापक संघाचे उपाघ्यक्ष व ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांची प्रतिक्रिया आहे. प्राध्यापक संपावर नाहीत, ते दररोज महाविद्यालयात हजर राहून हजेरीपटावर सहय़ा करीत आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी विद्यापीठ परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे, असे डॉ. प्रवीण रघुवंशी यांची प्रतिक्रिया आहे.

Story img Loader