विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमासोबत विविध कला रुजविण्याचा प्रयत्न
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सर्वत्र सुरू असताना मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आता दर शनिवारी ‘विनादप्तराची शाळा’ भरणार आहे. या दिवशी नेहमीच्या पाटी-पुस्तकांना सुट्टी देत शाळेत परिसर अभ्यास, विविध कला, खेळांचे वर्ग भरणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या ‘दप्तराचे ओझे’ कमी करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये सर्व पातळ्यांवर चर्चा, प्रयोग, प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच मिरजेचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी तालुक्यातील मुख्याध्यापक आणि उपक्रमशील शिक्षकांसोबत नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये या उपक्रमाला अंतिम रूप देण्यात आले. शनिवारी अध्र्या दिवसाची शाळा असते. या दिवशी मुलांच्या दप्तराचे ओझे बाजूला केले तर असा विचार करून ‘विनादप्तर शाळा’ भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी अभ्यास न घेता परिसर अभ्यासाबरोबरच कला-संस्कृती, खेळ यातून ज्ञानसंवर्धन करायचे असे ठरले. तालुक्यातील काही शाळांमध्ये या उपक्रमाची चाचणी घेण्यात आली. त्याचे यश पाहून आता संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील १७४ शाळांमधील २५ हजार विद्यार्थी या उपक्रमात येत्या शनिवारपासून सहभागी होणार आहेत.
- मुलांना कोणताही क्रमिक अभ्यासक्रम शिकवला जाणार नाही. याऐवजी परिसर अभ्यासाची सत्रे शाळेत किंवा शाळेबाहेर प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन घेतली जातील.
- यामध्ये सुतार, कुंभारकामासारख्या पारंपरिक व्यवसाय कला, विविध उद्योग, सामाजिक-शैक्षणिक संस्था, निसर्ग परिसंस्था आदींची ओळख करून दिली जाणार आहे. याशिवाय सामूहिक वाचन, नाटय़-चित्रपटांचे सादरीकरण, ज्ञानवर्धक विविध स्पर्धाचे आयोजन केले जाईल.
- स्थानिक खेळांना उत्तेजन देत त्यांचे आयोजनही या दिवशी केले जाणार आहे. व्यायाम, योगासने, मलखांब, विविध कलाप्रकारांची ओळख या दिवशी करून देण्यात येणार आहे. या साऱ्यांतून विद्यार्थ्यांना एक दिवस तरी दप्तराविना अनुभवता येईल.