अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग नेमका कोणाचा हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. राज्यातील आणि राष्ट्रीय पातळवीवरील यंत्रणा या कामाबाबत हात झटकत असतील तर, दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे.
सुरवातीला अलिबाग ते वडखळ हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता. नंतर मात्र याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले. सुरवातीला या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याचे सर्वेक्षण, प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला होता. पण रस्त्याच्या किमतीपेक्षा भुंसपादनाची किंमत अधिक असल्याने आणि याच परिसरात अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्याने या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव बारगळण्यात आला. त्यामुळे हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या रस्त्याचे दुपदरीकरण आणि मजबूतीकरण केले जाणार होते. मात्र यासंदर्भात काहीच हालचाल झाली नाही. आज रस्त्याची अलिबाग शहराच्या वेशीवर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावर असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत. त्यामुळे शनिवारी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे सातत्याने पहायला मिळत आहे. या खड्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. खड्यामुळे प्रवासी, वाहनचालकांचे हाल होत असतांना, रस्ता दुरूस्ती करायची कोणी यावरून संबधित यंत्रणा टोलवाटोलवी सुरू असल्याचे सध्या पहायला मिळते आहे.
हेही वाचा… मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; येत्या २० फेब्रुवारी रोजी…
राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे जाण्यास सांगत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी रस्ता आमच्याकडे हस्तांतरीतच झाला नसल्याचे दावा केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता पुर्वी आमच्याकडे होता आता तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे तीनही यंत्रणा या रस्त्याची जबाबदारी स्वीकारत नसल्याने दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न अलिबागच्या नागरिकांना पडला आहे.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष्यवेधण्यासाठी अलिबाग येथील खड्डे अँक्टीव्हीस्ट दिलीप जोग यांनी नुकतेच आंदोलन केले. खड्ड्यांसमोर बसून प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या उदासिनतेबाबत संताप व्यक्त केला. आमचा रस्ता बेवारस आहे का, देशातील आणि राज्यातील यंत्रणा जर हा रस्ता दुरूस्ती करणार नसतील तर दाद पाकिस्तान, की चीन मध्ये दाद मागायची का असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.