लता मंगेशकरांना देवाने काळजीपूर्वक घडविले आणि अशी मूर्ती पुन्हा घडवायची कशी, हे तो विसरून गेला. माझी नात गाते व नृत्य करते, पण अद्याप मोठे काम करावयास तिला अवकाश आहे. गरिबी फार छान असते, श्रीमंतीत मुलांना कशाची फारशी पर्वा नसते. तूर्तास मंगेशकरांचा वारसा चालविणारे मला कुणीही दिसत नाही, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.
नागपूर महोत्सवात गुरुवारी आशा भोसले यांचा कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्त त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आजकालची गाणी ऐकणे मी बंद केले आहे. आजकाल चांगली गाणी लिहिलीच जात नाहीत तर संगीतकार संगीत देणार काय अन् गायक चांगले गाणार काय? ‘हलकट जवानी’ किंवा ‘मुन्नी बदनाम’ ही काय गाणी आहेत? लोकांनी अशी गाणी का बघावीत? कमी कपडय़ातील मुली नाचताना तुम्ही बघता म्हणून ते आणखी कमी कपडय़ातील मुली दाखवतात, असे त्या म्हणाल्या. मोकळा वेळ मिळाला की मी शास्त्रीय संगीत किंवा गुलाम अली ऐकते. नाहीतर सीआयडी मालिका बघते, असे त्यांनी सांगताच हशा पसरला.
‘सुरेश भटांची फार आठवण येते. आजकाल मराठीतही फारसे अर्थपूर्ण होतच नाही. मी मात्र फार नशीबवान आहे. मला साहिरपासून मजरूहपर्यंत आणि अगदी भीमसेन जोशींबरोबर काम करायला मिळाले. ८१व्या वर्षांपर्यंत लोक जगतही नाहीत. मी गाऊ शकते, लोकांचे अफाट प्रेम आहे. अजून काय हवे, असे त्या म्हणाल्या.
मी स्पष्ट बोलते ते राजकारणात चालत नाही. त्यामुळे खासदारकी किंवा अन्य कुठल्याच पदाची मला अपेक्षा नाही. – आशा भोसले