महाराष्ट्रातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यस्था राहिली नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सोनपेठ येथे पत्रकारांशी बोलताना केले.
सोनपेठ येथील व्यापारी विठ्ठल हाके याने ९ जुल रोजी पोलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली. त्या नंतर संतप्त जमावाने सोनपेठ पोलीस ठाण्यावर हल्ला करून जाळपोळ केली होती. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांनी ६०० नागरिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. त्याच्या निषेधार्थ सोनपेठ शहर पाच दिवस पूर्णत: बंद होते. या पाश्र्वभूमीवर विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सोनपेठ शहराला भेट दिली. या वेळी त्यांनी मृत विठ्ठल हाके याच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नंतर सोनपेठ शहरातील व्यापारी व नागरिकांची त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भेट घेतली. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या भेटी दरम्यान त्यांनी गृहमंत्र्यांचा पोलिसांवर धाक राहिला नसून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही, असे सांगितले.
राज्यात शेतकऱ्यांची मोठी गंभीर परिस्थिती आहे. उद्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा न केल्यास सगळे विरोधक एकत्र येऊन सरकारला धारेवर धरू. सगळे  विरोधक एकत्र असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सोनपेठ शहरातील नागरिकांवर झालेला पोलिसी अन्याय दूर करू. झालेल्या प्रकरणात पोलीस दोषी असून त्यांच्यामुळे सोनपेठकरांवर लावलेले गंभीर गुन्हे मागे घ्यायला लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Story img Loader