अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (भिंगार) निवडणुकीत मतदारांना नकाराधिकाराचा (नोटा) अधिकार मिळणार नाही. हे मतदान यंत्राद्वारे होणार असले तरी यात ‘नोटा’ची तरतूद नाही!
कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक नव्या वर्षांत दि. ११ जानेवारीला होणार आहे. उमेदवारांचे चिन्हवाटपही झाले असून ७ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिनियम २००७ नुसार ही निवडणूक होत असून त्या वेळी मतदानात ‘नोटा’ची तरतूद नव्हती. केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यानंतर म्हणजे अलीकडेच निवडणूक कायद्यात ही दुरुस्ती करून ‘नोटा’ लागू केला. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक त्यापूर्वीच्या अधिनियमानुसार होत असल्याने त्यात नकाराधिकाराची तरतूद नसल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उमेदवारांच्या चिन्हवाटपानंतर या निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. भिंगारमधील गल्लीबोळा त्याने गजबजू लागल्या आहेत. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तिन्ही प्रमुख पक्ष या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी सर्व जागा लढवत आहेत, तर मनसे पाच जागांवर रिंगणात उतरली आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत युती झाली असली तरी प्रभाग क्रमांक पाचमध्ये दोन्ही पक्षांत अपेक्षेप्रमाणे युती तुटली आहे. येथे दोघांमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचे दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले. शिवाय, प्रभाग चारमध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश लुणिया यांनी बंडखोरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा