सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील विमला गार्डन परिसरात असलेल्या नाल्याचे पाणी बघून येतो असे सांगून गेलेल्या एकाचा नाल्यात पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. नोएल फेलिक्स तेक्केकारा वय (२९) मुळ रा. नेरुळ, नवी मुंबई असे त्यांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद धर्मगुरू लिजू जोसेफ रा. रायगड यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नोवेल तेक्केकारा हे मुंबईहून मे महिन्यात ख्रिश्चन धर्मातील आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी देवसु येथे आले होते. आज सोमवारी दुपारी जेवण झाल्यानंतर धर्मगुरू जोसेफ यांना मी नाल्यातील पाणी बघून येतो असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळातच त्या गार्डनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्याने आरडाओरडा केली.त्यानंतर जोसेफ यांनी पाहिले असता तेक्केकारा यांचा पाय निसटून ते पाण्यात पडले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाण्यात उतरून शोधाशोध केली असता ते सापडून आले नाही म्हणून याबाबतची माहिती त्यांनी आंबोली पोलिसांना दिली.
आणखी वाचा-Narayan Rane : “जयंत पाटलांच्या विनंतीमुळे आदित्य ठाकरेंना जाऊ दिलं, नाहीतर…”, नारायण राणे आक्रमक
आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी रेस्क्यू टीमचे बाबल अलमेडा व मायकल डिसोजा यांना त्या ठिकाणी पाचरण करण्यात आले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने माडखोल पुलाजवळ तेरेखोल नदीच्या नजीक पाण्याच्या प्रवाहात तेक्केकारा हे मिळून आले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास मयत घोषित केले. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.